मुंबईCM Eknath Shinde On Old Pension Scheme : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करावी यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या बैठकीतील निर्णयाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज सभागृहात निवेदनाद्वारे दिली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आमदार तसंच विविध संघटनेचे प्रतिनिधी, वरिष्ठ शासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित होते. सदर बैठक जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भातील राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी सुरू केलेलं आंदोलन तसंच त्यावर यापूर्वी शासनाने नेमलेली सुबोध कुमार समितीमार्फत शासनास प्राप्त झालेले अहवाल, या संदर्भातील शासनाची भूमिका यावर चर्चा करण्यात आलीय.
मुख्य सचिवांना निर्देश: बैठकीत उपस्थित असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचारी, मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या मागणीनुसार त्यांच्या संघटनेच्या मान्यतेबाबत मुख्य सचिवांना निर्देश देण्यात आले आहेत. कर्मचारी संघटनेने ज्या मागण्या केलेल्या होत्या, त्या सर्व सकारात्मक भूमिकेने तपासून त्यावर निर्णय घेण्यात आलेला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितलं.
26000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होणार लाभ : 31 मे 2005 पूर्वी जाहिरात दिलेल्या, अधिसूचित केलेल्या पदावरील नियुक्त्यांना यामध्ये महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 अंतर्गत समाविष्ट करणे, याबाबतचा प्रस्ताव मान्य करून मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येत आहे. याचा लाभ सुमारे 26000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्याचबरोबर 80 वर्षावरील निवृत्तीवेतनधारकांना केंद्राप्रमाणे अतिरिक्त निवृत्तीवेतन अदा करणे या संदर्भातला देखील प्रस्ताव मान्यतेच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याचबरोबर सेवा निवृत्ती मृत्यू उपदानाची मर्यादा केंद्राप्रमाणे वाढविण्याबाबत देखील निर्णय घेण्यात येत आहे.