मुंबई :भारतात पहिल्यांदाच आयोजित केल्या जाणाऱ्या फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप या ई व्हेईकल्सच्या कार रेसमधील कारचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, तसेच तेलंगणाचे नगर विकास मंत्री के. टी. रामा राव यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी गेटवे ऑफ इंडियांच्या प्रांगणात शानदार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार अनावरण सोहळ्यास तेलंगणाच्या नगर विकास विभागाचे सचिव अरविंद कूमार, तसेच ग्रीनको समुहाचे संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल चलमाशेट्टी आदी उपस्थित होते. तेलंगणामधील हैद्राबाद येथे ११ फेब्रुवारीला ही फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप कार रेस पार पाडणार आहे.
समृद्धी महामार्गावर रेसचे मुख्यमंत्र्यांचे निमंत्रण :ई-व्हेईकल्स वर्ल्ड चॅम्पियनशिप या उपक्रमाचे कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले की, देशात होणाऱ्या पहिल्या अशा उपक्रमाची सुरूवात मुंबईतून होत आहे, याचे समाधान आहे. मुंबई ही देशाची शान आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या प्रांगणात हा सोहळा होत आहे, यालाही वेगळे स्थान आहे. नुकताच जी-२० ची आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची बैठक झाली. त्यांना परिसर खूप आवडला होता. अशी ही फार्म्युला रेस महाराष्ट्रातही व्हावी अशी अपेक्षा आहे. त्यासाठी येथे रस्त्यांचे उत्तम जाळे आहे. नुकतेच आम्ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग खुला केला आहे. हा महामार्ग या रेससाठी उत्तम ठरेल. त्यामुळे यात सहभागी होणारेही खुश होतील, असे निमंत्रणही मुख्यमंत्र्यांनी या स्पर्धा आयोजकांना आपल्या भाषणात दिले. यावेळी मुख्यमंत्री यांनी भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते विकास आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील कामांची प्रशंसाही केली. त्यांच्यामुळेच मुंबईत ५५ उड्डाण पुल उभे राहील्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.