मुंबई : ठाकरे गटाचे नेते व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फरार बुकी अनिल जयसिंघानीसोबतचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या फोटोची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबतच महाविकास आघाडीतील नेत्यांचे अनिल जयसिंघानीसोबत नेमके काय संबंध आहेत? याची सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये उद्धव ठाकरे फरार जयसिंघानी याचे स्वागत करत असल्याचे दिसून येत आहे. 2014 साली जयसिंघानीने शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळचा हा फोटो आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
जयसिंघानी पुन्हा चर्चेत : अनिल जयसिंघानीवर एकूण 17 गुन्हे दाखल असून त्याला जुगार आणि सट्टा लावण्याच्या गुन्ह्याखाली तीन वेळा अटक करण्यात आली होती. सोबतच एकूण 5 राज्यांच्या पोलिसांसाठी अनिलचे मोस्ट वोन्टेड गुन्हेगारांच्या यादीत नाव आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी बँक अमृता फडणवीस यांच्याकडे तब्बल 10 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी फरार अनिल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अमृता फडणवीस यांच्या खंडणी प्रकरणात अनिलची 25 वर्षाची मुलगी डिझायनर अनिक्षा हिला गुरुवारी मुंबई पोलिसांनी अटक केली. या सर्व प्रकरणाचे पडसाद विधान भवनात उमटले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नीच सुरक्षित नाही तर सामान्य जनतेचं काय? असे म्हणत विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.