मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यां हातून आता शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गेले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश शुक्रवारी दिला. निवडणूक आयोगाच्या निकालात शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले गेले आहे. या विरोधात उद्धव ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिल्याची समोर आली होती. यानंतर आता एकनाथ शिंदे गटाने सुद्धा सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने आव्हान दिल्यास सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे ऐकूण एकतर्फी सुनावणी घेऊन नये. कोणताही आदेश संपूर्ण पडताळणी केल्याशिवाय देऊ नये. एकनाथ शिंदे गटाची बाजूही ऐकून घ्यावी, अशी विनंती कॅव्हेटद्वारे न्यायालयाला करण्यात केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे संकेत :निवडणूक आयोगाचा निकाल शुक्रवारी आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर शनिवारी दुसऱ्याच दिवशी मातोश्रीबाहेर उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळीही त्यांनी आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हणत अधोरेखीत केले. सोमवारी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका उद्धव ठाकरे यांच्यांकडून दाखल केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी शिंदे गटातर्फे कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाने दाखल केली तरीही त्यावर एकतर्फी सुनावणी घेऊन कोणताही आदेश जारी करू नये, आमचीही बाजू ऐकली जावी असे या अर्जात एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.