मुंबई :मुख्यमंत्री सुट्टीवर असूनही काम करत असल्याचे दिसून येत आहे. प्रलंबित फाईल्सचा ढीग वाढू नये, सर्वसामान्यांची कामे मार्गी लागावीत. तसेच, अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहावे, अशा मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रशासनाला सूचना दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या तीन दिवसांपासून साताऱ्यातील जरे या मूळगावी गेले आहेत. राज्यातील नव्या राजकीय समीकरणाच्या चर्चेमुळे नाराज होऊन मुख्यमंत्र्यांनी सातारा गाठल्याच्या चर्चा झाल्या. विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या तातडीच्या सातारा दौऱ्याची खिल्ली उडवली.
मुख्यमंत्री १८ तास काम करतात : सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावत, मुख्यमंत्री १८ तास कामात झोकून देऊन काम करतात, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाची ऑनलाइन बैठक घेऊन, त्यावर शिक्कामोर्तब केले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण आपल्या कामासाठी मंत्रालय गाठतात. अनेकदा मंत्री, अधिकाऱ्यांकडून त्यांना वेळ मिळत नसल्याने हेलपाटे मारावे लागत होते. नुकतेच तीन जणांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आत्महत्येचा प्रयत्न केला. दोन जणांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर आसूड ओढल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वसामान्यांसाठी मंत्री, अधिकारी यांना वेळ राखून ठेवण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री शिंदे यांनी सुट्टीवर असताना ही आदेशाचे पालन करताना दिसून आले.