मुंबई CM Eknath Shinde On Police House : नायगाव येथील बीडीडी चाळ परिसरातील भवानी माता मंदिराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी भेट दिली. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना ते म्हणाले की, पोलिसांच्या निवासस्थानाबाबत तसेच बीडीडी चाळीसंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल. तसेच अनेक वर्षे प्रलंबित असलेले प्रकल्प शासनाच्या वतीनं पूर्ण करण्यात येतील. त्याचबरोबर पोलिसांच्या घरांसाठी (Police House) प्रयत्न करणार आहोत. मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय.
स्वच्छता कर्मचारी हे खरे हिरो : मनपाच्या माध्यमातून संपूर्ण स्वच्छता मोहीम मुंबईत राबविली जात आहे. बस थांबे स्वच्छ ठेवावेत, दुभाजकांमधील झाडे व्यवस्थित लावावेत, रस्ते एक दिवसाआड धुतले जावेत, धूळ उडू नये यासाठी बांधकाम सुरू असलेल्या इमारती झाकल्या जाव्यात अशी खबरदारी घेतली जात आहे. या मोहिमेत अधिकाऱ्यांबरोबरच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. या मोहिमेचे खरे हिरो स्वच्छता कर्मचारी आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं कौतुक केलंय.
मुंबई प्रदूषणमुक्त करणार : मुंबईतील संपूर्ण स्वच्छता मोहीम ही आता लोकचळवळ बनली आहे. स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी, अशासकीय संस्था यात सक्रीय सहभाग घेत आहेत. तसेच स्वच्छता हा आरोग्याचा मूलमंत्र आहे. या मोहिमेमुळं नियमित सफाईची कामे करणं सोयीचं होत असून याचे परिणाम येत्या काळात दिसून येणार आहेत. मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्यात येत आहेत. सुशोभिकरणाची कामे वेगाने होत आहेत. प्रदूषणमुक्त मुंबईसाठी याचा मोठा लाभ होणार आहे. आगामी काळात मुंबई प्रदूषणमुक्त करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मुंबईत विशेष मुलांसाठी आणखी 2 प्रारंभिक उपचार केंद्र सुरू करणार :लहान मुलं आणि विद्यार्थी हे आपल्या देशाचे भविष्य आहेत. म्हणून मुलांना विशेष काळजीची गरज असते. अशा मुलांसाठी सुरू झालेल्या प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून मोफत उपचार केले जाणार आहेत. तसेच मुंबईत पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी एक-एक केंद्र सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, मुंबईच्या धरतीवर ठाणे येथेसुद्धा एक केंद्र सुरु करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा -
- मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक - एकनाथ शिंदेंची पुन्हा ग्वाही
- मराठा आरक्षण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक
- केंद्र सरकारच्या 'त्या' निर्णयाचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत; मानले आभार