मुंबई : शिवसेनेत पडलेल्या फुटीचा फायदा घेऊन भाजप आणि शिंदे गटाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकाकी पाडण्याची रणनीती आखली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतून शिवसेनेला हद्दपार करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू केला. परंतु, एकेकाळचे कट्टर विरोधक असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची भक्कम साथ ठाकरेंना मिळत आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या या प्रयत्नांना उद्धव ठाकरे यांच्याकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. आता महाविकास आघाडीत वंचित आघाडीचा समावेश झाल्याने शिवसेनेची ताकद वाढली आहे.
शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र : देशात हुकूमशाहीची राजवट सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवून राजकीय नेतृत्व संपवण्याचा घाट घातला जातो आहे. वैचारिक प्रदूषण वाढले आहे. लोकशाहीला मारक ठरतील अशा गोष्टी दिवसेंदिवस वाढत आहेत. लोकशाहीचे पावित्र टिकवणे आणि राजकारणातील वाईट चालीरीती रोखण्यासाठी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंचित आघाडीसोबत युती केल्याचे स्पष्ट केले. प्रकाश आंबेडकर देखील भाजप आणि आरएसएसच्या मनुस्मृती हिंदुत्ववादाच्या विचारसरणीची चिरफाड केली.
शिंदे गटाची धडधड वाढली : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यानंतर वंचित आघाडी आगामी निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत सामील झाली आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाची धडधड वाढली आहे. उद्धव ठाकरे यांना नामोहरण करण्याच्या अनेक क्लुप्त्या वापरून ही भाजपला अपेक्षित यश येत नाही. उलट उद्धव ठाकरे विरोधकांची मोट बांधणी करत, राज्यात भाजपविरोधी वातावरण तयार करत आहेत. भाजप त्यामुळे हतबल झाला असून आता थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रोखण्याच्या हालचाली दिल्लीतून सुरू झाल्याचे समजते.