मुंबई : शिंदे फडणवीस सरकारला पूर्ण होत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री दिल्लीच्या दौऱ्यावर होते. आषाढी एकादशीनिमित्त पूर्ण कुटुंबासोबत पंढरपूरमध्ये असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरूवारी पंढरपूरहून परिवारासह मुंबईला पोहोचले. त्यानंतर ते सायंकाळी दिल्लीला रवाना झाले. दिल्लीला जाण्यापूर्वी शिंदे - फडणवीस यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली होती. तसेच दिल्लीला जाण्यापूर्वी मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत दिल्लीमध्ये भेट झाली आहे. यांच्यासोबत गुरूवारी रात्री उशिरा दिल्लीत बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षाची एक समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. तसेच रात्री ते उशिरा परतल्याची माहिती मिळत आहे.
समन्वय समितीची होणार स्थापना :शिंदे - फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना दुसरीकडे राज्यात शिंदे शिवसेना गट व भाजप पक्षाची एक समन्वय समिती स्थापन करण्याचा विचार बऱ्याच दिवसापासून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आहे. त्या अनुषंगाने भाजपचे तीन ते पाच त्याचबरोबर शिवसेनेचे (शिंदे गट) सुद्धा तीन ते पाच नेते या समितीत असतील असे सांगण्यात आले आहे. लवकरच समितीची घोषणा होऊन त्याची पहिली बैठकही आयोजित केली जाणार आहे. परंतु या समन्वय समितीत कुठले नेते असतील याचे सर्वस्वी अधिकार हे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहेत. यासोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ४ जुलै रोजी भाजपच्या सर्व खासदारांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश सर्व खासदारांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार :राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करणे फार गरजेचे आहे. त्या अनुषंगाने दिल्लीमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अमित शाह यांच्याशी सविस्तर चर्चा केल्याची माहिती आहे. त्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणाचा समावेश केला जाईल व त्यांना कुठली खाती दिली जातील, याबाबत चर्चा झाली आहे. शिंदे गटामध्ये असलेल्या पाच मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. पण सध्या तरी कुठलीही कारवाई करू नये किंवा त्यांच्या मंत्रीपदावरून काढले जाऊ नये, अशी ही माहिती समोर येत आहे. परंतु केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये खराब कामगिरीमुळे १२ किंवा त्यापेक्षा अधिक मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
केंद्र आणि राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्ताराचा काही संबंध नाही. केंद्राचा कधी होणार हे आम्हाला माहिती देखील नाही. आमचा राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात जास्त रस आहे. राज्यातील अनेक प्रश्न असतात त्यासाठी केंद्राची भेट घ्यावी लागते. तसेच जुलै महिल्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री