मुंबई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पेशल विमानाने अयोध्येनगरीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे रविवारी अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. त्यांचा हा दौरा सध्या चर्चेत आहे. स्पेशल विमानाने शिंदे आपल्या मंत्र्यांसोबत शनिवारी सायंकाळी मुंबईवरून अयोध्येसाठी रवाना झाले होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने आमचे स्वागत केले त्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे. हा राजकीय दौरा नाही. मी अनेकवेळा अयोध्येला आलो आहे. पण मु्ख्यमंत्री म्हणून मी पहिल्यांदाच अयोध्येला आलो आहे.
विरोधकांवर टीका - राज्यात सत्तेवर आल्यानंतर अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. सरकारच्या चांगल्या निर्णयामुळे विरोधक भांबावून गेले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काहीजण घरात बसले होते, ते देखील घराबाहेर पडून जनतेला भेटत आहेत. परिवर्तनाची सुरुवात आहे, असा चिमटा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरेंना काढला. अजित पवार यांच्यावरही मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधत, शेतकऱ्यांना पाणी ऐवजी काय देतात याची आठवण करून दिली.
अयोध्येशी जिव्हाळ्याचे नाते - अयोध्येत राम मंदिर व्हावे, ही दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि रामभक्त यांची इच्छा आहे. शिवसेना आणि अयोध्या यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत. योगी आदित्यनाथ यांच्याकडून सहकार्य मिळणे, ही अभिमानाची बाब आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. राज्यात रावणराज सुरू असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. ज्यांचा जन्म झाला नव्हता तेव्हापासूनच आम्ही काम करत आहोत. त्यामुळे त्यांच्या टीकेला कामांतून चोख उत्तर देऊ, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
भाजपचे नेते सहभागी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मुंबई विमानतळावरुन अयोध्येसाठी उड्डाण केले होते. एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यात शिवसेना आणि भाजपचे नेते सहभागी झाले आहेत. भाजप नेते संजय कुटे, राम शिंदे, गिरीश महाजन देखील अयोध्येला रवाना झाले होते.