मुंबई : बालदिनाचे औचित्य साधून मुलांना जास्तीत जास्त आनंद लुटता यावा, यासाठी शाळांकडून विविध उपक्रम राबवले जातात. परळच्या शिरोडकर हायस्कूलमध्येही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी मुलांना ताटकळत ठेवले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांविरोधात उपस्थितांनी नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला.
कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित - आज बालदिन( Children Day program ) , या दिनानिमित्त लहान मुलांसोबत आपल्या आठवणींना उजाळा दिला जातो. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परळच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये बालदिन उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री आणि मुलांमध्ये गप्पांचा कार्यक्रम ठेवला होता. दुपारी २ वेळ ठेवण्यात आली होती.
परळच्या शिरोडकर हायस्कूलमधील मुले
मुख्यमंत्र्यांची मात्र अनुपस्थिती -मुख्यमंत्री शाळेत येणार म्हणून शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सकाळी १० वाजताच बोलावले होते. मात्र, मुख्यमंत्री या कार्यक्रमाला ही वेळेत पोहोचले नाहीत. दुपारी साडेतीन वाजले तरी मुख्यमंत्री कार्यक्रमाला हजर झाले नाहीत. मुलांमध्ये चिडचिड वाढली होती. शिक्षकांना मुलांच्या मनोरंजनासाठी बालगीते म्हणावी लागली आणि मुलांकडून बोलवून घेतली. अनेक मुलांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कथा सांगत ताटकळत असलेल्या मुलांमध्ये उत्साह आणण्याचा प्रयत्न करत होते.
उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली -राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नियोजित कार्यक्रमाला नेहमीच उशिरा पोहचतात, असे बोलले जाते. आज बालदिनाच्या दिवशीही मुख्यमंत्री शिरोडकर हायस्कूलमध्ये उशिरा येणार असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांच्या दुपारी ३ वाजेपर्यंत बैठका सुरू होत्या. त्यामुळे उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.