मुंबई : शिवसेनेत बंडखोरी करत सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १५ आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. उद्यापासून ( दि. 13 तारखेपासून ) या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे फडणवीस सरकार कोसळेल असा दावा विरोधकांकडून केला जातो आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना याबाबत, प्रश्न विचारण्यात आला असता, आमच्याकडे संख्याबळ आहे 40 आमदार, तेरा खासदार आमच आहेत. आम्हाला कसलीही भीती नाही. कोर्टाने निवडून आलेल्या संख्याबळावर निर्णय घ्यावा, ही आमची मुख्य भूमिका आहे. त्यामुळे आम्हाला सरकार पडण्याची बिलकुल भीती नाही. आमची बाजू भक्कम आहे. हे सरकार कायद्याने बनवण्यात आल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले.
काहीजणांचे कोर्टाला सल्ले :शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने निवडणूक आलेल्या संख्याबळाऐवजी पक्षाच्या प्रादेशिक कार्यकारणीचा विचार करावा, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावरून उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला. काहीजण सर्वोच्च न्यायालयाला सल्ला देत आहेत. पूर्वी ते उच्च न्यायालयात सल्ला देत होते. आता कोर्टाला सल्ला देतात. ज्यांची बाजू भक्कम नसते, तेच लोक असे ओरडून सांगतात, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. तसेच आमच्याकडे बहुमत असल्याने असे उद्योग आम्ही करत नाही. आज आमच्याकडे बहुमत असून शिवसेना आणि धनुष्यबाणवर आम्ही दावा, केल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.