महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नियमांचे पालन करा, अन्यथा लॉकडाऊनला समोर जावे लागेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - CM Uddhav Thackeray meeting

कोरोना विषयक सर्वत्र दाखविल्या जाणाऱ्या बेफिकीरीबाबत चिंता व्यक्त करत, कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले.

CM Uddhav Thackeray meeting
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Feb 16, 2021, 7:45 PM IST

Updated : Feb 16, 2021, 8:05 PM IST

मुंबई -कोरोना विषयक सर्वत्र दाखविल्या जाणाऱ्या बेफिकीरीबाबत चिंता व्यक्त करत, कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले. मास्क वापरा, गर्दी टाळा अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला समोर जावे लागेल, असेही ते म्हणाले.

सार्वजनिक कार्यक्रम, सभा, विवाह समारंभ आदींमध्ये उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवतानाच मास्क वापरणे बंधनकारक आहे. जे नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, टास्क फोर्सचे सदस्य आदी उपस्थित होते.

हेही वाचा -करोनाबाबत सातत्याने सावधगिरी बाळगा राज्यपालांचे आवाहन

जिल्ह्यांचा आढावा घेऊन मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट आल्याने नागरिकांमध्ये बेफिकीरी आली आहे. त्यामुळे, कोरोना प्रतिबंधासाठीच्या सूचनांचे पालन होताना दिसत नाही. लोकांमध्ये जरी शिथीलता आली असली, तरी यंत्रणांमध्ये ती येऊ देऊ नका. नियमांची कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्यात सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे आंदोलने, सभा, मिरवणुका यांना परवानगी देऊ नये. विवाह समारंभामध्ये उपस्थितांच्या मर्यादेचे पालन केले जाते का, याची यंत्रणेकडून तपासणी झाली पाहिजे. ज्या भागात रुग्णसंख्या वाढत आहे तेथे कंटेन्मेंट झोन करायची तयारी ठेवा, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

राज्यात महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना सर्वसामान्यांना लागू असून त्याला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोना उपचारासाठी जी क्षेत्रीय रुग्णालये करण्यात आली आहेत त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांनी ग्रामीण आणि शहरी भागात सार्वजनिक ठिकाणांचे, शौचालयांचे, बसस्थानके, उद्याने या ठिकाणी निर्जंतुकीकरणाचे काम हाती घ्यावे. नियमांचे पालन करायचे की पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जायचे याची निवड लोकांच्या हातात आहे. त्यामुळे, पुढच्या काळात अधिकची खबरदारी घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

कोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्यांना जो निधी देण्यात आला आहे त्यातील शिल्लक असलेला निधी ३१ मार्चपर्यंत वापरायला परवानगी देण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

जनारोग्य योजनेला मार्चपर्यंत मुदतवाढ देत ज्या भागात जास्त रुग्ण आढळून येत आहेत तेथील सार्वजनिक कार्यक्रमांमधील गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची सूचना आरोग्यमंत्री टोपे यांनी केली.

महत्वाचे मुद्दे -

- कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा. एका रुग्णाचे किमान 20 तरी संपर्क शोधलेच पाहिजे.

- मधल्या काळात आपण 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम राबवून राज्याचा आरोग्य नकाशा तयार केला. यातील सह व्याधी रुग्णांची परत आरोग्य कर्मचाऱ्यांनी विचारपूस सुरू करावी.

- ज्या व्यावसायिक संस्था, संघटना लॉकडाऊन उठविण्यासाठी आपणाकडे येत होत्या त्या सर्व संबंधित संस्था, संघटना यांच्याशी परत एकदा बोलून एसओपीची काटेकोर अंमलबजावणी होईल याची खात्री करून घ्या.

- जिथे कंटेन्मेंट आवश्यक आहे तिथे ते करा व त्याची अंमलबजावणी करा.

- बँक्वेट हॉलमध्ये कोणी विनामास्क आढळल्यास हॉल मालकावर कारवाई करावी.

- ज्या भागात रुग्ण आढळून येत आहेत तेथे जाऊन कोरोना चाचणी करावी.

- विवाह समारंभासाठी पोलीस परवानगी आवश्यक आहे.

बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय आदी उपस्थित होते.

हेही वाचा -अखेर बीडीडी चाळीचा अहवाल राज्य सरकारला सादर

Last Updated : Feb 16, 2021, 8:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details