मुंबई- देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील जनतेचे आभार मानले. तसेच गेल्या पाच वर्षात अनेक विकासकामे केल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेकडून सांगितले जात असलेला अडीच वर्षांचा निर्णय माझ्यासमोर कधीच झाला नव्हता व तसा शब्दही दिला नसल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे. उद्धव ठाकरे यांच्या आजुबाजूची लोकं आमच्यात दरी निर्माण करत असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांचे नाव न घेता लगावला. हंगामी मुख्यमंत्री म्हणून मी जबाबदारी सांभाळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकार स्थापनेसाठी शिवसेनेने चर्चा थांबवली असून त्यांची भाषा बदलली आहे. आमच्यासोबत चर्चा नाही. मात्र, आघाडीच्या नेत्यांसोबत दिवसातून दोन दोन बैठका केल्या. त्यामुळे ही चर्चा शिवसेनेने थांबवल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच यावेळी त्यांनी राज्यातील जनतेचे, विरोधी पक्षांसह माध्यमांचे व शिवसेनेचे आभार मानले आहेत.