मुंबई - गेल्या १५ वर्षात आघाडी सरकारने मोडकळीला आलेल्या इमारतींचा प्रश्न नीट हाताळला नाही. यासंदर्भात कोणतेही संयुक्तीक धोरण आखले नाही. त्यामुळे अशा घटनांना आता तोंड द्यावे लागत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुंबईचे नव नियुक्त भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्तिथीत सूत्र स्वीकारली यावेळी ते बोलत होते.
आघाडी सरकारच्या काळात धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांवर खापर - मुंबई
मुख्यमंत्र्यांनी डोंगरी येथील केसरबाई इमारत कोसळल्याने मुंबईतल्या जुन्या आणि मोडकळीला आलेल्या इमारतींचे खापर विरोधकांवरच फोडले आहे.
मुंबईत मोडकळीला आलेल्या आणि जुन्या इमारतींचा प्रश्न गंभीर आहे. तसेच शहरातल्या अनेक भागात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे पुनर्विकासाला अडथळा येत आहे. गेल्या पंधरा वर्षात आघाडी सरकारने कोणत्याही योजना आखल्या नाहीत. संबंधित रहिवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, महायुती येत्या चार वर्षात हा प्रश्न तडीस नेणार आहे . पुनर्विकासाच्या कामात कुणी अडथळा आणत असेल, तर त्याविरोधात जाऊन पुनर्विकास सोपा होईल, असा कायदा सरकार करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर प्रेम आहे. त्यामुळेच त्यांनी अनेक परवानग्या आपल्याला मिळवून दिल्या आहेत. केंद्राच्या सहकार्यामुळे शहरात अनेक लोकाभिमुख प्रकल्प सुरू झाले आहेत. आधीच्या सरकारने मुंबईला केवळ सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणूनच पाहिले, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. केवळ मुंबईच नाही तर एमएमआरडीए क्षेत्राच्या विकासावरही या सरकराने भर दिला आहे. येत्या काही वर्षात मुंबई नजीकच्या या परिसरात ही वातावरण बदलेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.