मुंबई- साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही. तुम्हीही लग्नाला या, असे आपुलकीचे आमंत्रण परभणी जिल्ह्यातील विठ्ठलराव गरूड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. तर पहिल्यांदा कर्जमुक्तीसाठी हेलपाटे मारावे लागले नाहीत, अशी भावना अहमदनगर जिल्ह्यातील पोपट मुकटे या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांजवळ व्यक्त केली. या दोन्ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया शेतकरी कर्जमुक्ती योजना यशस्वी झाली असल्याचे सिद्ध करणाऱ्या ठरल्या.
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याचा शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाला. त्यानिमित्त परभणी, अहमदनगर आणि अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. यावेळी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली. विधानभवनात झालेल्या या कार्यक्रमास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, कृषी मंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, माजी मंत्री दिवाकर रावते, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते.
हेलपाटे मारावे लागले का?
या योजनेचा लाभ घेताना काही त्रास झाला का? किती हेलपाटे मारावे लागले? किती कर्ज होते? कुठल्या पीकाला कर्ज घेतले होते? पूर्वीच्या आणि आताच्या कर्जमुक्ती योजनेमध्ये काय फरक जाणवला, असे प्रश्ने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लाभार्ध्यांना विचारली. त्यावर योजनेबाबत शंभर टक्के समाधानी असल्याची भावना अहमदनगर जिल्ह्यातील पोपट मुकटे यांनी व्यक्त करताना मागील वेळी पाच ते सहा वेळा चकरा माराव्या लागल्या होत्या. यावेळी केवळ एका थंबवरच काम झाले, असे त्यांनी सांगितले.
लेकीला आणि जावयाला लग्नाच्या शुभेच्छा
परभणीच्या पिंगळी येथील विठ्ठलराव गरूड यांनी कर्जमुक्तीची रक्कम मिळणार असल्याने चिंता मिटल्याची भावना व्यक्त केली आणि मुलीच लग्न जमलंय, अशी आनंदाची बातमी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलीला कुठे दिलं, अशी आपुलकीची विचारपूस करतानाच लेकीला आणि जावयाला लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या. हा संवाद ऐकताना हरकून गेलेल्या विठ्ठलराव यांनी लगोलग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मुलीच्या लग्नाचे आमंत्रणही दिले.
योजनेच्या यशाचे श्रेय यंत्रणेला- मुख्यमंत्री