मुंबई Amit Shah Meeting Cancelled : शेती प्रश्नाच्या मुद्द्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आज केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेणार होते. मात्र, आजची भेट रद्द झाली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय. आजच्याऐवजी सोमवार किंवा मंगळवारची वेळ अमित शाह यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलीय. मात्र, मुख्यमंत्र्यांसह आम्ही सोमवारी भेटीची वेळ मागितली असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. ते आज नागपुरात पत्रकांराशी बोलत होते.
अमित शाह व्यग्र असल्यानं भेट रद्द :कांद्यांच्या निर्यातीवर केंद्र सरकारनं बंदी घातलीय. यामुळं कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. तसंच इथेनॉलच्या निर्मितीवर देखील सरकारनं बंदी घातलीय. त्याचबरोबर दुधाचे दर घसरले आहेत. याच मुद्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज दिल्लीला जाऊन गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार होते. मात्र, आजचा दौरा रद्द झालाय. अमित शाह व्यग्र असल्यानं आज होणारी भेट सोमवारी किंवा मंगळवारी होणार आहे.