मुंबई: आज आज सायंकाळी मुंबई हवामान विभागाने चेतावणी जारी केली आहे. या चेतावणी नुसार पुढील 3-4 तासांत ठाणे, रायगड, पुणे, अहमदनगर, हिंगोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहून पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
आज अधिक तापमानाची नोंद:मुंबईत आज कमाल तापमान ३९.३ अंशांवर पोहोचले होते. कमाल तापमानाची ही स्थिती सोमवारपर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मुंबईत आज दिवसभर कडक ऊन आणि कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईकर हैराण झाले असले तरी रात्री वातावरणात काही प्रमाणात गारवा जाणवत असल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सोमवारी सांताक्रूझमध्ये कमाल तापमान ३९.३ अंश सेल्सिअस होते, तर कुलाबा येथे ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. सांताक्रूझमधील तापमान शनिवारच्या तुलनेत २.३ अंशांनी अधिक होते. सायंकाळी सांताक्रूझमध्ये ३३ टक्के तर कुलाबा येथे ५४ टक्के आर्द्रतेची नोंद झाली. कमी आर्द्रतेमुळे उष्णतेच्या लाटा अधिक जाणवत असल्याचे हवामान खात्याने सांगितले.