मुंबई- जगभरात पसरलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी देशभरातील विविध रूग्णालये आणि संस्थांनी पुढाकार घेतला असून आता मुंबई मेट्रो प्रशासनाने खबरदारीचे पाउल उचलले आहे. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो-1 मधील मेट्रो स्थानक आणि गाड्यांची साफसफाई 'मुंबई मेट्रो वन प्रा. लिमिटेड'ने (एमएमओपीएल) हाती घेतली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून ही साफसफाई अशीच काही दिवस पुढेही सुरू राहणार आहे.
मेट्रो स्थानक आणि गाड्यांची साफसफाई सुरू मेट्रो मार्ग 1 वर नेहमीच प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. अशावेळी कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी साफसफाई, स्वच्छता याकडे बारीक लक्ष देणे गरजेचे आहे. त्यानुसार एमएमओपीएलने आता साफसफाई वाढवली आहे.
हेही वाचा -Coronavirus : सॅन फ्रान्सिस्कोमधील 131 भारतीयांची मायदेशी परतण्यासाठी केंद्र सरकरकडे याचना
मेट्रो स्थानकाचा संपूर्ण परिसर स्वच्छ आणि निर्जंतुक केला जात आहे. तर सरकते जिने, तिकीट मशीन, लिफ्ट, स्वच्छतागृह अशा सर्व ठिकाणांचीही साफसफाई केली जात आहे. मेट्रो गाड्याही साफ करत निर्जंतुक केल्या जात आहेत. तसेच मेट्रो कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. त्यांना मास्क, सॅनिटायझर्स पुरवण्यात येत आहेत. तर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही सर्व उपाययोजना करण्यात आल्याचे एमएमओपीएलने सांगितले आहे.
करोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारसह देशातील सर्व राज्ये, आरोग्य केंद्रे, सामाजिक संघटना, विविध संस्था वेगवेगळ्या उपाययोजना आणि खबरदारी घेत आहेत. त्यामुळे मेट्रोसारख्या सार्वजनिक ठिकाणी मेट्रो प्रशासनाने खबरदारी म्हणून विविध उपाययोजना केल्या आहेत.
हेही वाचा -Coronavirus : मंत्रालयातही 'कोरोना'चा धसका, सुरू केली 'स्वच्छता मोहीम'