मुंबई -राज्यातील 12 हजार हेक्टरवरील टोमॅटो पीक उद्ध्वस्त करणाऱ्या अज्ञात विषाणूबाबत बंगळुरूस्थित संशोधन संस्थेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर आता शास्त्रज्ञ विरुद्ध शेतकरी असा संघर्ष पेटला आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली संकलित केलेले रोगग्रस्त टोमॅटोचे नमुने संगमनेर येथील उपविभागीय कृषी विभागाकडून पाठवण्यात आले. संगमनेर व फलटण (जि. सातारा) भागातील नऊ शेतकऱ्यांच्या रोगग्रस्त टोमॅटो शेतातील पाने व फळांच्या एकूण २० नमुन्यांचे शास्त्रीय परीक्षण करण्यात आले. यात इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप, इलायसा व पीसीआर या अद्ययावत तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला. याद्वारे प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार १६ नमुन्यांमध्ये मावा किडीमार्फत पसरणारा कुकुंबर मोझॅक विषाणू (सीएमव्ही) आढळले. तर फुलकिडीमार्फत पसरणारा ग्राऊंटनट बड नेक्रोसिस विषाणू (जीबीएनव्ही) (टॉस्पोव्हायरस) चार नमुन्यांमध्ये आढळला. पांढया माशीमार्फत पसरणारे टोमॅटो क्लोरोसीस विषाणू (टीसीव्ही) रोगाचे प्रमाणही तेवढेच आढळले. टोबॅको व्हेन डिस्टॉर्शन व्हायरस (टीबी विडीव्ही) या माव्याद्वारे पसरणारे रोगाचे प्रमाण तीन नमुन्यांत तर टोमॅटो लीफ कर्ल न्यू दिल्ली व्हायरस (टीओएलसीएनडीव्ही) या पांढऱ्या माशीमार्फत पसरणाऱ्या रोगाचे प्रमाण व टोमॅटो मोझेक व्हायरसचे प्रमाण (टीओएमव्ही) (२ नमुने) आढळले.
प्रादुर्भावाची कारणे महाराष्ट्रात आढळत असलेल्या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव व दिसत असलेली लक्षणे (विशेषतः फळ पिवळ्या रंगाचे दिसणे) यामागील कारणे सांगताना कृषी शास्त्रज्ञ आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचा टास्क फोर्स स्थापन करून रोगाच्या नियंत्रणाच्या तातडीने उपाययोजना कराव्यात, असा अहवाल संस्थेने दिला आहे.
शेतकऱ्यांकडून दबाव वाढल्यानंतर कृषी विभागाने पाठवलेल्या नमुन्यांवर शेतकऱ्यांच्या तिखट प्रतिक्रिया येत आहेत. टोमॅटो उत्पादक पट्ट्यात मागील पन्नास वर्षांपासून टोमॅटोचे उत्पादन घेतले जात आहे. शेतकरी बंधू स्वतःच्या ज्ञानाचा तसेच कंपनीमार्फत पुरवलेल्या ज्ञानाचा वापर करून उच्च उत्पादन घेत आहेत. संशोधन संस्थेने उपस्थित केलेल्या बाबी ह्या दरवर्षीच होत असतात. मागील वर्षी ही फळ पक्वतेच्या काळात 40 डिग्री सेल्सिअसच्या पुढे तापमान होते. त्यावेळी अशा काही समस्या शेतकऱ्यांना भेडसवल्या नाहीत. रासायनिक खतांचा वापर करताना टोमॅटो उत्पादक शेतकरी कधीही अतिरेक करत नाही किंवा ठरल्या प्रमाणेच रासायनिक खते वापरतो. त्यामुळे कुठेही नत्रयुक्त खतांचा अतिरेक होत नाही आणि तो झालाच तर टोमॅटोमध्ये सेटिंग अजिबात व्यवस्थित होत नाही, हे शेतकऱ्याला देखील माहीत आहे.
यातील बरेच शेतकरी माती परीक्षण करूनच खतांची मात्रा देतात. सदरचा दिसत असणारा रोग एक दोन एकरवर नसून जवळपास 15,000 एकरापर्यंत महाराष्ट्रातील प्रमुख टोमॅटो पट्ट्यांमध्ये पसरलेला आहे. एकाच वेळेला वरील सर्व गोष्टी प्रत्येक शेतात दिसणे शक्य नाही, असा आरोप शेतकरी अजित कोरडे यांनी केला आहे.
या रोगासाठी भारतातील नामांकित शास्त्रज्ञांची समिती तयार करून त्यांना शेतात बोलवून सत्य परिस्थिती दाखवणे गरजेचे आहे. यामध्ये काल काही वृत्तपत्रांनी टोमॅटोमध्ये कोणताही अज्ञात व्हायरस नाही, अशीही बातमी दिली. परंतु, टोबॅको व्हेन डिस्टॉर्शन व्हायरस (टीबीव्हीडीव्ही) हा आतापर्यंत कधीही टोमॅटोवर दिसला नाही आणि तोही नवीनच म्हणावा लागेल. महाराष्ट्रातील प्रत्येक टोमॅटो उत्पादक पॉकेटमधील वातावरण काही अंशी वेगळं आहे. परंतु, या रोगाचा प्रादुर्भाव आता जवळपास फलटण, बारामती, अकोले, संगमनेर, नारायणगाव पट्ट्यात देखील दिसत आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या भागात शेतकरी किंवा नर्सरी चालक चुकीच्या प्रॅक्टिस करतील आणि त्यामुळे हा रोग वाढेल अशी कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे सदरचे आलेले रिपोर्ट शेतकरी म्हणून आम्हाला मान्य नाहीत यासाठी सरकारने उच्चस्तरीय समिती नेमून याच्या ग्राउंडवरील अभ्यास करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
ज्यावेळी बियाणे उत्पादक कंपन्या बियाण्यांचे घेतात तेव्हा तरी या वरील सर्व गोष्टींचे पालन करतात का? हा चिंतनाचा विषय आहे. तपासणीचे आलेले सर्व रिपोर्ट्स पाहता यातून बियाणे कंपन्यांना क्लीन चिट दिलेली दिसत आहे. बऱ्याच कंपन्या बियाण्यांच्या माहितीच्या पत्रकात आमची जात या रोगासाठी प्रतिकारक्षम आहे, असे जाहीर करतात. तरीही त्या जातीवर त्या विषाणू रोगाचा प्रादुर्भाव होतो, ही दुर्दैवाची बाब आहे आणि आमच्या लेखी ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे.
सदरच्या रिपोर्टसोबत शेतकऱ्यांना संपूर्ण अॅडव्हायझरी देणे अपेक्षित होते, तशी कोणत्याही प्रकारची अॅडव्हायझरी देण्यात आली नाही. टोमॅटो उत्पादक शेतकरी म्हणून आम्ही आमच्या शेतातील काही भाग सरकारी संस्थांना टोमॅटो पिकवण्यासाठी देण्यास तयार आहोत. त्यांनीच आमच्या प्लॉटमध्ये येऊन या सर्व गोष्टी फॉलो करून टोमॅटोचे उत्पादन घेऊन दाखवावे. त्यामुळे आम्हा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना एक दिशा मिळेल आणि इथून पुढे या रोगाचे व्यवस्थापन कसे करावे याचाही मार्ग आम्हाला सापडेल, असे आव्हान कृषी कीटकशास्त्रज्ञ डॉ.अंकुश चोरमुले यांनी केले आहे.
महाराष्ट्रात आढळत असलेल्या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव व दिसत असलेली लक्षणे (विशेषतः फळ पिवळ्या रंगाचे दिसणे) यामागील कारणे सांगताना संशोधन संस्थेने कुकुबर मोबॅक व्हायरस (सीएमव्ही) व त्याच्यासोबत एक किंवा दोन अन्य विषाणूजन्य रोग (कॉबीनेशन) अशी ही मुख्य समस्या राहिली आहे. फळ पक्व होण्याच्या वेळी तापमान ३५ अंश सेल्सियसच्या वरती जाणे, त्याचबरोबर अनधिकृत टॉनिक किंवा कीडनाशकांचाही वापर झाला असल्याची शक्यता देखील या कारणांमागे आहे. कोणत्या भागातून रोपे आणली आहेत, ही बाबही विचारात घेण्याजोगी आहे, असे म्हटले आहे.
टोमॅटोवरील रोग नियंत्रण शक्य आहे. मानवी आरोग्याला धोका नाही. बियाणे रोपवाटिकेपासून पिकाचे व्यवस्थापन काटेकोर व प्रभावी केल्यास या रोगांचे नियंत्रण शक्य असल्याने शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये, असे आवाहन संस्थेचे संचालक डॉ. रेड्डी यांनी केले आहे. परिक्षणात आढळलेले सर्व विषाणू हे वनस्पतीतील असल्याने मानवी आरोग्याला त्यांच्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचा स्पष्ट निर्वाळाही डॉ. रेड्डी यांनी दिला आहे.
किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी टोमॅटो विषाणूच्या अहवालाबाबत शंका व्यक्त केली असून याबाबत लवकरच राज्य सरकारकडे सर्वव्यापी पॅकेजची मागणी करण्यात येईल, असे सांगितले. विषाणू नमुन्यांसोबत बियाणे नमुने पाठवले ते याबाबत तातडीने अहवाल जाहीर करावे.
एकंदरीतच कोरोनाच्या संकटामध्ये टोमॅटो विषाणूचे संकट कायम असून पुढील हंगामात लागवड करायची कशी? असा शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे. राज्य सरकार यामध्ये हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा देणार का? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीतच आहे.