मुंबई : विधान परिषदेमध्ये (Eknath Khadse Vs Girish Mahajan) दोन कट्टर विरोधक एकमेकांसमोर उभे राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे व भाजपचे नेते, मंत्री गिरीश महाजन यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. अखेर काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी यामध्ये मध्यस्थी केली.
महाजन यांचे मुख्यमंत्र्यांजवळचे वजन कमी झाले : विधानपरिषदेत कामकाज सुरू असताना कापसाला योग्य भाव नसल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. यापूर्वी कापसाला ७ हजार रुपये दर मिळावा म्हणून स्वतः गिरीश महाजन हे उपोषणाला बसले असल्याची आठवण खडसे यांनी सभागृहात करून दिली. एकनाथ खडसे इतक्यावरच थांबले नाहीत तर, महाजन यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळचे वजन कमी झाले असून त्यांना कोणी विचारत नाही. म्हणूनच कदाचित ते पालकमंत्री झाले नाहीत, असा टोलाही लगावला.
महाजन यांचा खडसे यांच्यावर प्रतिहल्ला : एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या आरोपावर गिरीश महाजन चांगलेच संतापले. माझे वजन कुणाजवळ काय आहे हे मला माहिती आहे. तुम्ही तुमचं बघा, एकेकाळी दहा, बारा खात्याचे मंत्री असलेला माणूस आज मागाच्या दारातून येऊन आमदार झाला आहे. जिल्ह्यामध्ये कोणी विचारत नाही, इतकेच नाही तर आमदारकी गेली, दूधसंघ गेला, जिल्हा बँक गेली शेवटी तर ग्रामपंचायत पण गेली, असा थेट प्रतिहल्ला खडसे यांच्यावर महाजन यांनी चढवला. हा वाद इतका टोकाला जात असताना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दोन्ही नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेर मी साभगृह काही काळ तहकूब करू का? असा संतप्त सवाल गोऱ्हे यांनी केला. तरीसुद्धा दोन्ही नेत्यांचे एकमेकांवरचे आरोप- प्रत्यारोप संपले नाहीत.
भाई आले मध्यस्थीला : भांडण एवढे टोकाला गेले की, सर्वच नेते हतबल झाले. संपूर्ण सभागृह या दोन्ही नेत्यांकडे पाहत होते. अखेर भाई जगताप यांनी संताप व्यक्त करत दोन्ही नेत्यांना शांत केले. तुम्ही दोन मोठे नेते असे भांडणार असाल तर आम्ही काय आदर्श तुमच्याकडून घ्यायचा, असा संतप्त सवाल भाई जगताप यांनी केला. अखेर दोन्ही नेते शांत झाले व सभगृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाले.
हेही वाचा -
- Ajit Pawar In Dhule Program: धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे न लावल्याने अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी
- Relief to Khadse : माजी मंत्री एकनाथ खडसे यांना उच्च न्यायालयाचा दिलासा
- Girish Chaudhary : राष्ट्रवादीच्या 'या' आमदाराच्या जावयाची तब्बल 20 महिन्यांनंतर तुरुंगातून सुटका