महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Uday Samant On MLA Clash : शिंदे गट आमदारांमध्ये चकमक ही अफवाच, उद्याेगमंत्री सावंत यांनी राजीनाम्याचे वृत्तही फेटाळले

मंत्रीपदावरून शिंदे गटाच्या आमदारांमध्ये संघर्ष झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने राष्ट्रपतींचा दौरा सोडून मुंबईला रवाना झाले. यावर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे.

Uday Samant On MLA Clash
Uday Samant On MLA Clash

By

Published : Jul 6, 2023, 8:42 PM IST

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार सरकारमध्ये सामील होताच, मंत्रीपदावरून शिंदे गटाच्या आमदारांमध्ये चकमक उडाली. धक्काबुक्कीपर्यंत प्रकरण जाताच, मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रपतींचा दौरा सोडून तातडीने मुंबईला रवाना झाले. शिंदे गटात धाकधूक सुरु असतानाच, मुख्यमंत्री राजीनामा देणार असल्याचे वृत्त पसरले. या सर्व घडामोंडीवर शिंदे गटाच्या नेत्यांना पत्रकार परिषद घेऊन खुलासा करावा लागला. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी, मुख्यमंत्री राजीनामा देत नाहीत द्यायला लावतात. त्यामुळे सर्व प्रकार अफवा आहेत. शिवसेनेच्या सर्व आमदारांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला असून पक्षात कोणतीही नाराजी नाही, अशी माहिती सामंत यांनी दिली. बाळासाहेब भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राजीनामे देण्याचे वृत्त बिनबुडाचे : एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी राहणार, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. अजित पवार मुख्यमंत्री होतील, शिंदे राजीनामा देणार हे वृत्त बिनबुडाचे आहे. हे वृत्त पसरवणाऱ्यांचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाही, असे उदय सामंत यांनी ठणकावले. आम्हाचा महायुतीवर ठाम विश्वास आहे. एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाखाली निवडणुका होतील हे देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्रीपदाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या गोष्टी घडलेल्या नाहीत, त्या घडल्याचे सिध्द करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री मुंबईत परतल्याचे वृत्त चुकीचे :एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करणारे शिवसेनेचे ४० आमदार, १० अपक्ष आमदार राजकारणात ज्येष्ठ आहेत. दोन आमदारांमध्ये बाचाबाची झाल्याने मुख्यमंत्री मुंबईत परतल्याचे वृत्त चुकीचे आहे. कालच्या बैठकीत राष्ट्रवादी सोबत जायचे नाही, असे भाषण रामदास कदम यांनी केल्याची माहिती खोडसाळ आहे, असा खुलासा सामंत यांनी केला. पावसाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेचे जास्तीत जास्त मंत्री शपथ घेतील, अशी माहिती त्यांनी दिली. आमच्या सहकाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही, मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. महायुतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा करुन निर्णय घेतला, असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावर विश्वास :एकनाथ शिंदेंचे नेतृत्व संयमी, सर्वांना सोबत घेऊन जाणारे आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत काहीही बोलले तर चालेल, असे समजून अफवा पसरवल्या जात आहेत. अशा अफवा पसरवणाऱ्यांचा आम्ही शोध घेत आहोत. बैठकीत सर्वांनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात विकासकामे करत आहेत. आमच्या लोकांची विकासकामे व्हायला हवीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताकद वाढवण्यासाठी आम्ही सहभागी झाल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे याबाबत कोणताही गैरसमज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

महायुती भक्कम :शिवसेनेबाबत संभ्रम निर्माण करुन आपली पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न केला जात आहे. ज्या पक्षातून गेल्यावर्षी उठाव झाला तिथे परत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. महायुती भक्कम आहे. राज्याला स्थिर सरकार दिले जात आहे. आगामी निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढवल्या जातील. विधानसभा, लोकसभेच्या आगामी निवडणुकीत कसे काम करावे, यावर बैठकीत चर्चा झाली. मंत्र्यांवरील जबाबदारी, बुथस्तरावर काम करण्यासाठी संघटना अधिक मजबूत करणे, आमदारांची संख्या वाढण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

तीन्ही नेते तळागाळात काम करणारे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे तीन्ही नेते तळागाळात काम करणारे आहेत. त्यांना राज्याच्या सर्व मतदारसंघाची व्यापक माहिती आहे. त्यामुळे तीन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात ४५ पेक्षा अधिक खासदार निवडून आणण्याचा निर्धार सामंत यांनी व्यक्त केला. कोण किती जागा लढवणार याबाबत तीन्ही नेते एकत्रित निर्णय घेतील. राष्ट्रवादी ९० जागा लढवणार या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अशी वक्तव्ये केली जातात. त्यांनी म्हटले म्हणून त्यांना लगेच जागा मिळाली असे, होत नाही. याबाबत बैठकीत निर्णय घेतला जातो असे त्यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे सक्षम मुख्यमंत्री :महायुतीत समावेश होण्याचा निर्णय हा अजित पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील उठाव आहे. त्यामुळे गद्दार, खोके या टीकेमधून आमची सुटका झाली आहे. मागील अडीच वर्षे राज्यात प्रशासन, शासन काम करत नव्हते. यावर या उठावाने शिक्कामोर्तब केले आहे, असे ते म्हणाले. तत्कालिन मुख्यमंत्र्यांचे नेतृत्व सक्षम नसल्याने रायगडमध्ये वाद झाले होते. आता एकनाथ शिंदे सक्षम मुख्यमंत्री असल्याने असे वाद होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. निवडून येण्याच्या निकषावर निवडणूक लढवली जाईल, असेही ते म्हणाले. आमदार संजय शिरसाट यांनी लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका मांडली, ते नाराज नाहीत. शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरतशेठ गोगावले भाकरी पू्र्ण मिळण्याऐवजी अर्धी मिळेल असे म्हणाले, नाराजी वगैरे काही नाही, असा खुलासा त्यांनी केला.

दादा भुसे नाराज नाहीत :मनसे, उबाठा एकत्र येण्याच्या चर्चेबाबत त्यांनी काय करावे याबाबत मी बोलू शकत नाही, असे सामंत म्हणाले. मु्ख्यमंत्र्यांना रिक्षावाला म्हणून टीका करणारे एखाद्याच्या व्यवसायावरुन टीका करत आहेत. हे राजकारणातील हीन दर्जाचे द्योतक आहे, मात्र तेच कौतुक करतात की सर्वसामान्य व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आले. आमच्यावर टीका करणाऱ्यांनी राष्ट्रवादीने महायुतीत प्रवेश केल्यावर खोके, गद्दार टीका का बंद झाली हे देखील सांगावे. गद्दार, खोके म्हणून हिनवणे माझ्या स्वभावात नाही, मी लोकशाही मानतो असे पवार म्हणाले होते, खोके-गद्दार टीका करणाऱ्यांनी पवारांचा हा गुण घ्यावा, असे ते म्हणाले. नाशिक पालकमंत्री पदाबाबत दादा भुसे नाराज नाहीत असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

हेही वाचा -Political Crisis In NCP : शरद पवारांनी दिल्लीत बोलावलेली बैठक बेकायदेशीर, अजित पवारांचा दावा

ABOUT THE AUTHOR

...view details