मुंबई- कोरोना काळात नागरिकांकडे कामधंदा नाही. त्यामुळे, लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत म्हाडा वसाहतीवर सेवा शुल्कामध्ये ५० टक्के सवलत सरकारने द्यावी, तसेच एसआरएचे (झोपडी पुनर्विकास प्राधिकरण) प्रकल्प अर्धवट असल्याने काही नागरिक इतरत्र राहात आहेत. त्यांचे भाडे विकासकांनी दिलेले नाही. हे भाडे मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणी आज भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली.
अनेक ठिकाणी पुनर्विकास प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे, काही नागरिकांना इतरत्र राहावे लागत आहे. त्यांना विकासकाने अद्याप भाडे दिलेले नाही. त्यामुळे, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. यासाठी विकासकाने थकवलेले भाडे खोली धारकांना द्यावे. जर विकासक भाडे देत नसेल, तर ते सरकारने द्यावे. अशी मागणी करत, या प्रकरणी मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली 'मुख्यमंत्री भाडे भरा' मोहीम सुरू असल्याचे दरेकर यांनी सांगितले.