मुंबई - राज्य सरकारने ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत अशा नागरिकांना लोकल प्रवासामध्ये सूट दिली आहे. राज्य सरकार व मुंबई महापालिकेकडून अशा नागरिकांना त्यासाठी ऍपच्या माध्यमातून ऑनलाइन ओळखपत्र दिले जातील. तसेच ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाहीत त्यांना ऑफलाइन पद्धतीने ओळखपत्र दिली जातील, अशी माहिती पालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली. कोरोनाचा प्रसार पूर्णपणे थांबण्यासाठी आणखी एक वर्षाचा कालावधी लागू शकतो. या कालावधीत लसीचे दोन डोस असलेल्या नागरिकांचा मुभा दिली जाणार आहे. यामुळे मुंबईकरांनी लसीचे दोन्ही डोस घ्यावेत, असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले.
ऍपच्या माध्यमातून ओळखपत्र
मुंबईसह एमएमआर रिजनमधील सामान्य नागरिकांना लोकल रेल्वेतून प्रवास करता यावा यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी केली जात होती. याबाबत उच्च न्यायालयानेही राज्य सरकारची कान उघडणी केली होती. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासामध्ये मुभा देण्याची घोषणा केली आहे. यावेळी बोलताना ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यानंतर 14 दिवसात अँटीबॉडीज तयार होतात. ज्या नागरिकांनी लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस झाले आहेत अशा नागरिकांनाच रेल्वे प्रवासामध्ये मुभा देण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका आणि सरकारकडून ऑनलाइन ऍपच्या माध्यमातून ओळखपत्र दिले जाईल. त्यासाठी येत्या दोन दिवसात पालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ऍप विकसित केले जाईल, असे आयुक्तांनी सांगितले. ज्या नागरिकांकडे स्मार्ट फोन नाहीत अशा नागरिकांना ऑफलाइन ओळखपत्र दिले जाईल. त्यासाठी पालिका कार्यलयातून नागरिकांना सहकार्य केले जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले.
नोव्हेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होईल
मुंबईमध्ये एकूण 76 लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यामधील 56 लाख नागरिकांना पहिला तर 19 लाख नागरिकांना लसीचे दोन डोस देण्यात आले आहेत. मुंबईमधील 19 लाख आणि बाजूच्या शहरातील आणि जिल्ह्यातील 15 लाख, अशा एकूण 30 लाख नागरिकांना प्रवासाची मुभा मिळणार आहे. मुंबईत 90 लाख नागरिकांना लसीचे डोस देण्यासाठी एकूण 1 कोटी 80 लसीचे डोस लागणार आहेत. मुंबईमधील एकूण 61 टक्के नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. खासगी कॉर्पोरेट संस्थांच्या सीएसआर फंडाचा वापर करून मोफत लसीकरण केले जात आहे. यामुळे येत्या नोव्हेंबरपर्यंत मुंबईकरांना लसीचे डोस दिले जातील, असे आयुक्तांनी सांगितले.