मुंबई :शिवसेना कोणाची? हा वाद निवडणूक आयोगाच्या कोर्टात सुरू होता. आयोगाने यावर निर्णय देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून कागदपत्रे मागवून घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी आमदार, खासदारांसह लाखोंच्या संख्येने पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र पाठवली होती. दरम्यान, विधानसभा आणि लोकसभेतील सदस्य संख्येनुसार आयोगाने निर्णय द्यावा, अशी शिंदे गटाची मागणी होती. अखेर, निवडणूक आयोगाने यावर शुक्रवारी मुख्यमंत्री शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. यावर सगळीकडून प्रतिक्रिया येत आहे. या निर्णयाचा परिणाम सर्व सामान्य नागरिकांवर देखील होत आहे. ईटीव्ही भारतने काही सर्वसामान्य नागरिकांसोबत संवाद साधला. त्यांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह :या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते. भाजपने मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूने आलेल्या निकालाचे स्वागत करत उद्धव ठाकरे यांच्यावरती निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ही ठाकरेंना टार्गेट केले जात आहे. तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरेंच्या बाजूने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. हे वाद सुरू असले तरी सर्वसामान्यांना देखील निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नसल्याचे दिसून येत आहे.