मुंबई : माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना धमकी देण्यात आल्याची घटना गेल्या महिन्यात समोर आली होती. आमदार जितेंद्र आव्हाडांची मुलगी नताशा आणि जावयावर गोळी झाडण्याची धमकी देण्यात आली होती, या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. तसेच आव्हाड यांच्या कुटुंब आणि मुलीला संरक्षण देणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
सभागृहात मुद्दा उपस्थित : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ठाण्यातील मनपाच्या अधिकाऱ्याकडून विधानसभेचे सदस्य असलेल्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीचा मुद्दा विशेष बाब म्हणून उपस्थित केला. संबंधित ठाणे मनपाच्या अधिकारी उघडपणे धमकी देणाऱ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभय मिळत असल्याचे समजते. एका आमदाराला धमकी आल्यानंतर त्यावर कारवाई ऐवजी सुरक्षा कवच देणे, ही बाब योग्य नाही. संबंधित त्या अधिकाराच्या मालमत्तेची चौकशी करावी, अशी मागणी देखील दानवे यांनी सभागृहात केली.
सीआयडी चौकशीचे आदेश : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. ही बाब अतिशय गंभीर असून निषेधार्ह आहे. या प्रकरणात त्या अधिकाऱ्याची स्थानिक पोलिसांशी ओळख असल्याने सीआयडी अधिकारी देऊन त्याची चौकशी केली जाईल. तसेच एक ऑडिओ सीडी तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवली आहे. त्याचा अहवाल आला की कारवाई करू, असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिले. आव्हाड प्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा दावा केला.