मुंबई - महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातील अनेक मौल्यवान दाग-दागिने, वाहिलेल्या वस्तू व पुरातन नाणी गैरव्यवहाराची सीआयडीमार्फत चौकशी होणार आहे. याची माहिती आज गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.
तुळजाभवानी देवस्थानचा खजिना व भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी देवी मंदिरातील दरोडा प्रकरणी सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर 'कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देवस्थानचा खजाना व जामदार खान्यातील अति प्राचीन ऐतिहासिक व पुरातन सोन्या-चांदीच्या वस्तू, मौल्यवान अलंकार व प्राचीन नाणी यांचा काळा बाजार व गैरव्यवहार झाला आहे का? याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर आवश्यकता असल्यास या संपूर्ण प्रकरणाची राज्य सीआडीमार्फत चौकशी केली जाईल', असे केसरकर यांनी सांगितले आहे.