मुंबई - जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोडच्या रुंदीकरणाच्या कमासाठी व मेट्रो रेल्वे-2 बी आणि मेट्रो-4 च्या कामात बाधक ठरणारी, अशी एकूण 1,700 झाडे हटविण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिका प्रशासनाने स्थानिक नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या आहेत. आरेमधील झाडे तोडण्यावरून झालेल्या विरोधानंतर आता रस्ते आणि मेट्रोकामासाठी झाडे तोडली जाणार आहेत. याबाबत पालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती काय निर्णय घेते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
झाडांची कत्तल -
जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोडच्या रुंदीकरणासह मेट्रो 2 बी व मेट्रो 4 च्या कामात अडथळा ठरणारी 1 हजार 700 झाडे हटविण्यात येणार आहेत. जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोडच्या कामात अडथळा ठरणाऱ्या 600 झाडांना अन्य ठिकाणी पुनर्रोपित करणे आणि 120 झाडे कापणे, यासाठी स्थानिक नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. मेट्रो 2 बी च्या कामात अडथळा ठरणारी 800 झाडे कापण्यासाठी अथवा अन्य ठिकाणी पुनर्रोपित करण्यासाठी स्थानिक लोकांना हरकती व सूचना पाठवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पर्यावरणप्रेमींकडूनही हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. लोकांच्या हरकती सूचना लक्षात घेत, वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.