मुंबई :भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत गेल्या २५ नोव्हेंबर रोजी वाघ यांनी या मंदिराला भेट दिली. त्यानंतर उत्साहाच्या भरात केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बांधलेल्या पतितपावन मंदिरात जाऊन पूजा केल्याचे नमूद केले. अशा प्रकारे चुकीची माहिती देऊन भागोजीशेठ कीर यांचे कार्य नष्ट करण्याचा प्रयत्न वाघ यांनी केला. गेल्या शतकातील दानशूर समाजसेवक भागोजीशेठ कीर यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सूचनेनुसार ही वास्तू बांधली आहे. म्हणून त्यांनी माफी मागावी; अन्यथा रत्नागिरीत फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये यांनी दिला आहे.
काय होते ट्विट :स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी रत्नागिरीत बांधलेल्या प्रसिद्ध पतित पावन मंदिरात मनोभावे पूजा केली. 'प्रत्येक व्यक्तीला मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन परमेश्वराला स्पर्श करून पूजा करण्याचा हक्क व अधिकार देणारे भारतातील पहिले मंदिर', असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले होते.
चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा नोंदवावा :या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत शेट्ये यांच्यासह काँग्रेसचे हारिस शेकासन, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, काँग्रेसच्या रुपाली सावंत इत्यादींनी सांगितले की, वाघ यांनी स्वातंत्र्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न रत्नागिरीत येऊन केला आहे. तशा आशयाचा फलक पतितपावन मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावलेला असतानासुध्दा हा खरा इतिहास न वाचता त्याची मोडतोड करून खोटा इतिहास पसरवून लोकांच्या भावना दुखावण्याचे काम केले. म्हणून त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी या नेत्यांनी केली आहे.