मुंबई -देशातील आयआयटीसोबत अत्यंत नामांकित अशा अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जेईई अॅडव्हान्सचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये पुण्याचा चिराग फलोर देशात पहिला आला. तर मुंबईतील स्वयम छुबे देशात आठवा आला आहे. तर मागील महिन्यात घेण्यात आलेल्या जेईई मुख्यमध्ये स्वयम हा पहिला आला होता.
जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल आयआयटी दिल्लीने जाहीर केला. देशभरात 27 सप्टेंबरला ही परीक्षा घेण्यात आली होती. परदेशातील काही केंद्रांवरही ही परीक्षा घेण्यात आली. देशभरातील 1 लाख 50 हजार 838 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली करोनाच्या पार्श्वभूमीवर नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 96 टक्के विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते. कारोना व टाळेबंदीमुळे परीक्षेला उशीर झाल्याने गतवर्षी जूनमध्ये जाहीर झालेला निकाल यंदा ऑक्टोबरमध्ये जाहीर झाला.
या परीक्षेत आयआयटी मुंबई विभागामधून चिराग फलोरने (विद्यार्थी गट व कॉमन रँक लिस्ट) प्रथम क्रमांक पटकावला आहे. चिरागला 396 पैकी 352 गुण मिळाले आहेत. विद्यार्थिनींच्या गटात आयआयटी रुरकी विभागामधून कनिष्का मित्तलने प्रथम क्रमांक पटकावला. तिला 396 पैकी 315 गुण मिळाले असून तिचा 17 वा रँक आहे.
मुंबई विभागात चिराग फलोर, आर. मुहेंदर राज, वेदांग असगावकर, स्वयम छुबे, हर्ष शहा यांनी पहिले पाच क्रमांक पटकावले. तर मुलींमध्ये नियती मेहता हिने प्रथम क्रमांक पटकावला. यंदा नव्या निकषांनुसार हा निकाल जाहीर झाला. त्यात बारावीच्या गुणांचा विचार करण्यात आलेला नाही. आतापर्यंत जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र ठरण्यासाठी इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना 75 टक्के गुण आवश्यक होते. मात्र, कोरोनामुळे या निर्णयाला या वर्षाकरीता स्थगिती देण्यात आली होती.