मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात भारत - चीन सीमावाद, देशाची आर्थिक स्थिती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कामगिरी, मनमोहन सिंग, केंद्र सरकारने तज्ञांशी बोलायला हवे, या मुद्द्यांवरील प्रश्नांना शरद पवार यांनी उत्तरे दिली.
भारत- चीन सीमा प्रश्नावर बोलताना पाकिस्तानची चिंता सोडा, चीनकडे लक्ष द्या, असे पवारांनी ठणकावले. त्यांच्या टार्गेटवर आता भारत आहे. चीनबरोबरचा संघर्ष लष्करी ताकदीने सुटणार नाही, डिप्लोमॅटिक पद्धतीनेच तो सोडवावा लागेल. चीनच्या राष्ट्रपतींशी गळाभेटीने ते कसे काय साध्य होणार, असा खडा सवाल त्यांनी केला. चीन आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे. आपल्या शेजारचे नेपाळ, बांग्लादेश हे देश आपल्या सोबत राहिले नाहीत ते चीनच्या बाजूने गेले आहेत, असेही शरद पवार म्हणाले.