मुंबई : पुजारीला चीनच्या अधिकाऱ्यांनी हाँगकाँगमधून ताब्यात घेतले होते. मुंबईत प्रसाद पुजारी विरोधात खंडणी, खून आणि खुनाचा प्रयत्न अशा अनेक गुन्ह्यांमध्ये तो वॉन्टेड आरोपी आहे. 2010 मध्ये भारतातून पळ काढून चीनमध्ये फरार झाला होता. त्यानंतर इंटरपोलने काढलेल्या रेड कॉर्नर नोटीसनंतर हॉंगकॉंगमध्ये त्याला गेल्या महिन्यात पकडण्यात आले होते. बनावट पासपोर्ट असल्याच्या आरोपाखाली गेल्या महिन्यात हाँगकाँगमध्ये अटकेत असलेल्या कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारीच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
प्रसाद पुजारी विमानतळावर पकडला गेला :भारताचा चीनसोबत प्रत्यार्पण करार नाही. मात्र, एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रत्यार्पण करार नसणे म्हणजे प्रत्यार्पणाची विनंती स्वीकारायची की नाही हे देशाच्या निर्णयावर अवलंबून आहे. त्या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, प्रत्यार्पणाची विनंती पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि चीन सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. आता प्रसाद पुजारीची ओळख पटवण्यासाठी चीनी अधिकाऱ्यांना डीएनए नमुन्यांसह अन्य गोष्टी पाठवणे आवश्यक आहे. इंटरपोलकडून मिळालेल्या माहितीनंतर प्रसाद पुजारी चिनी महिलेसह हाँगकाँगहून शेनझेनला जाणाऱ्या विमानात चढण्याच्या तयारीत असताना पकडला गेला. तो शेनझेनमध्ये आपल्या कुटुंबासह राहतो आणि एका चिनी महिलेशी प्रसाद पुजारीचे लग्न झाले आहे.