नाशिक- कोरोनाचा कहर सर्वत्र सुरू असून यामध्ये समाजातील सामान्य माणूस होरपळून निघत असल्याचे चित्र आहे. ज्या नागरिकांचे हातावर पोट आहे, अशा नागरिकांना दोन वेळच्या जेवणाची चिंता भेडसावत आहे. अशा नागरिकांच्या मदतील शहरातील दोन चिमुकले सरसावले आहेत. या चिमुकल्यांनी आपल्या पिगी बँकमधील पैसे खर्च करून गरजूंसाठी शिधा विकत घेऊन तो कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवा संस्थेकडे जमा केले आहे.
नाशिक येथील चिमुकल्यांनी पिगी बँकमधील पैसे खर्च करून गरजूंना केली मदत
मुलांनी समाजा प्रति दाखवलेली भावना बघून आई श्रुती भुतडा यांनी आपल्या मुलांना साथ देत गरजू कुटुंबासाठी लागणारा किराणा विकत घेतला व ते मुलांच्या हस्ते कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे जमा केला.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवा संस्था समाजातील गरीब, गरजू घटकांना शिधावाटप करत आहे. या संस्थेच्या कार्याची माहिती भूतडा परिवारातील शैनक आणि चिमुरडी सानवी यांना कळली. त्यानंतर या दोन्ही चिमुकल्यांनी आपल्या घरच्यांसमोर आम्हास गरजूंना मदत करायची आहे, अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर या चिमुकल्यांनी आपल्या पिगी बँकमध्ये साठवलेले पैसे काढून आईकडे दिले. कमी वयात मुलांनी समाजा प्रति दाखवलेली भावना बघून आई श्रुती भुतडा यांनी आपल्या मुलांना साथ देत गरजू कुटुंबासाठी लागणारा किराणा विकत घेतला व तो मुलांच्या हस्ते कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे जमा केला. लहान वयात मुलांमध्ये असलेली सामाजिक जबाबदारीची भावना पाहून शहरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.