मुंबई - 2 अ (दहिसर ते डीएन नगर) आणि 7 (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) मेट्रो मार्गासाठी बंगळुरू येथे 11 मेट्रो गाड्यांची बांधणी करण्यात येत आहे. त्यानुसार आता 27 वा 28 जानेवारीला यातील पहिली गाडी मुंबईत दाखल होणार आहे. या देशी बनावटीच्या पहिल्या गाडीचे अनावरण 29 जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या अनावरण कार्यक्रमाची जोरदार तयारी सद्या सुरू असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (एमएमआरडीए) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
कोरोनामुळे झाला विलंब
मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 चे काम डिसेंबर 2020 मध्ये पूर्ण होऊन ते सेवेत दाखल होणार होते. पण, कोरोना-लॉकडाऊनचा फटका या प्रकल्पाच्या कामाला बसला. त्यामुळे, प्रकल्पाची डेडलाईन सहा महिने पुढे गेली. त्यामुळे, आता मे-जून 2021 ची नवी डेडलाईन या दोन्ही मार्गासाठी एमएमआरडीएने दिली आहे. दरम्यान, या दोन्ही मार्गासाठी 11 गाड्यांची बांधणी बंगळुरू येथे करण्यात येत आहे. आत्मनिर्भर भारत संकल्पनेतून भारतातच मेट्रो गाड्यांची बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या 11 गाड्यांमधील 1 गाडी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत येणार होती. मात्र, गाडीचे काम पूर्ण न झाल्याने एक महिना विलंबाने आता गाडी मुंबईत येणार आहे. 27 व 28 ला गाडी मुंबईत दाखल होणार आहे.
मार्चमध्ये ट्रायल रन?
कोरोनामुळे पहिली डेडलाईन चुकली, तरी पुढे आणखी उशीर होऊ देणार नाही, असे म्हणत एमएमआरडीएने कामाला जोर दिला. दरम्यान, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मेट्रो गाडी आल्यानंतर 14 जानेवारीला ट्रायल रन घेण्यात येणार होती. पण, गाडीच न आल्याने ट्रायल रन आपोआपच रद्द झाली. पण, आता मात्र पहिली मेट्रो गाडी येणार आहे. तर, उर्वरित गाड्या एप्रिलमध्ये येण्याची शक्यता आहे. तेव्हा आता पहिली गाडी आल्यानंतर पुढील प्रक्रिया पार करत मार्चमध्ये मेट्रोची ट्रायल रन घेण्यात येण्याची शक्यता आहे.