महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कोरोनावर मात करूनच विजयाची गुढी उभारू'

या वर्षीचा गुढीपाडवा आज नाही तर कोरोनाच्या संकटावर मात करून विजयाची गुढी उभारून आपण साजरा करू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Mar 25, 2020, 1:25 PM IST

Updated : Mar 25, 2020, 4:02 PM IST

मुंबई- सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात संचारबंदी लागू आहे. आज मराठी नववर्ष असून आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडव्याने जल्लोषात साजरा केला जातो. या वर्षीचा गुढीपाडवा आज नाही तर कोरोनाच्या संकटावर मात करून विजयाची गुढी उभारूनच साजरा करू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

जनतेशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमाद्वारे पत्रकार परिषद घेत संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • हरवलेलं कुटुंब सुख अनुभवण्याची संधी -

मी आज काही नकारात्मक गोष्टी सांगायला आलो नसल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यातून अनेक सकारात्मक गोष्टीही पुढे येत आहे. आपल्याला आपल्या कुटुंबियांसमवेत वेळ घालण्याची संधी मिळत आहे. कुणी कॅरम खेळत आहे, कुणी बुद्धीबळ खेळत आहे, कुणी पुस्तक वाचत आहे तर कुणी कुटुंबियांशी संवाद साधत आहे. कुणी संगीत ऐकत आहे तर कुणी संगीत वाद्य वाजवत आहेत. आज पूर्ण कुटुंब यानिमित्ताने एकत्र आले आहे. तसेच मी मिसेस मुख्यमंत्र्यांचे ऐकतोय, घरी राहून तुम्ही तुमच्या होम मिनिस्टरचे ऐका, असे म्हणून त्यांनी वातावरणातील ताण कमी करण्याचा प्रयत्न केला

  • एसी बंद ठेवा -

विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसी बंद ठेवा असे आवाहन करतांना यानिमित्ताने मोकळ्या हवेत, वातावरणात राहण्याची संधी मिळणार असल्याचेही ते म्हणाले.

  • जीवनावश्यक वस्तू, सेवा, दुकाने, उत्पादनांची वाहतूक सुरु -

काल नागरिकांमध्ये थोडी अस्वस्थता होती, त्यांची धावपळ झाली, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, लॉकडाऊन आपल्याकडे आधी पासूनच सुरु आहे. पण एक गोष्ट प्रामुख्याने सांगतो की, आपल्याकडे पुरेसा अन्नधान्य साठा आहे. आपण जीवनावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता, दुकाने, रूग्णालये, पशुखाद्य, जनवारांची रूग्णालये, दुध, भाजीपाला, फळे, कृषी मालाची वाहतूक, औषधांची दुकाने बंद केलेली नाहीत. या जीवनावश्यक सेवा पुर्वीप्रमाणेच सुरु राहणार आहेत, त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये, गर्दी करू नये.

  • वेतन रोखू नये कंपन्यांना आवाहन -

हा शिवरायांचा लढवय्या महाराष्ट्र असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आता सर्वांना कोरोना विषाणूचे गांभीर्य कळाले आहे. हे जागतिक युद्ध आहे. हा छुपा शत्रू आहे, नकळत हल्ला करतो. याचे आव्हानही खुप मोठे आहे, ते गांभीर्यानेच घ्यायला हवे. जी रोजंदारीवर काम करणारी कष्टकरी माणसं आहेत, ज्यांचे हातावर पोट आहे, अशा कर्मचारी-कामगारांचे वेतन कंपन्यांनी, कारखान्यांनी बंद करू नये, ते सुरु ठेऊन मानव धर्म पाळावा, असेही ते म्हणाले.

  • हे युद्ध आपण जिंकणारच

मदतीसाठी पुढे येणाऱ्या अनेक हातांचे त्यांनी कौतूक केले. रिलायन्स इंडस्ट्रीने एक रूग्णालय तयार करून दिल्याचे ही त्यांनी सांगितले. कोणी मास्क उपलब्ध करून देत आहे, तर कुणी आणखी काही. या सगळ्यांच्या आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्यातून आपल्याला हे युद्ध जिंकायचेच आहे, नव्हे आपण ते जिंकणारच असा विश्वासही त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.

Last Updated : Mar 25, 2020, 4:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details