मुंबई- विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी. तसेच आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोनमध्ये कसे येतील ते पाहावे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप प्रसंगी योग्य तो निर्णय घ्यावा. पण, अंमलबजावणीत कुचराई करू नये, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दिले. आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील या कॉन्फरन्समध्ये सहभागी होते.
- मे अखेरपर्यंत राज्यात सर्वत्र ग्रीन झोन हवा -
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस हे ज्या पद्धतीने कोरोना परिस्थिती हाताळत आहेत, त्यासाठी त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. मात्र, येणाऱ्या काही दिवसांत ठोस रिझल्ट दिसला पाहिजे. लॉकडाऊन करणे सोपे होते, पण आता त्यात शिथिलता आणताना खरी परीक्षा सुरु झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये अजूनही लॉकडाऊनचे योग्य पालन होत नाहीत अशा तक्रारी येत आहेत. मला कल्पना आहे की आपण प्रयत्न करत आहात. पण, मे अखेरपर्यंत राज्य मोठ्या प्रमाणामध्ये ग्रीन झोनमध्ये आलेले दिसले पाहिजे.
- रेड झोनमधून इतर झोनमध्ये संसर्ग नको -
ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आपण उद्योग- व्यवसाय काही प्रमाणात सुरु केले आहेत. मात्र, या ठिकाणी रेड झोनमधून येऊन कुणी संसर्ग पसरवता कामा नये, ही काळजी घ्यावी लागेल. लक्षणे दिसत नसल्याने अनेक व्यक्ती या कामाच्या ठिकाणी जाऊन धोका पसरवू शकतात हेही आपल्याला पाहावे लागेल. काही वैद्यकीय कर्मचारी, पोलीस यांना संसर्ग झाला आहे हे चिंता वाढवणारे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
घाई गर्दीने आपल्याला काहीही करायचे नाही. आत्तापर्यंत आर्थिक आघाडीवर जे नुकसान व्हायचे ते होतच आहे. पण, आपण प्रयत्नपूर्वक नियंत्रणात आणलेली ही साथ आता कोणत्याही परिस्थितीत पूर्णत: रोखून पुढील नुकसान होऊ न देणे महत्वाचे आहे. जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील आणि अडकलेल्या लोकांचे येणे जाणे काटेकोरपणे नियम पाळूनच होईल हेही त्यांनी स्पष्ट केले.
- नॉन कोव्हीड रुग्णास दुर्लक्षित करू नका -
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, कोव्हीड आणि नॉन कोव्हीड रुग्ण या दोघांनाही योग्य आणि वेळेत उपचार मिळणे महत्वाचे आहे. आपापल्या भागातील डॉक्टर्सना, वैद्यकीय क्षेत्रातील चांगल्या लोकांना याकामी सहभागी करून घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.
- रुग्ण माहिती अद्ययावत ठेवावी -