मुंबई- माझगाव येथील जीएसटी भवनला दोन दिवसांपूर्वी आग लागली होती. त्या आगीत जीवाची पर्वा न करता इमारतीवरील राष्ट्रध्वज सुखरूप उतरवून खाली आणण्याचे काम येथील शिपाई कुणाल जाधव यांनी केले होते. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज सह्यादी अतिथीगृहात छोटेखानी सत्कार केला.
कुणाल जाधव यांच्या शौर्याची बातमी वाचल्यानंतर अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (दि. 18 फेब्रुवारी) ट्वीटरवरून त्यांच्या कर्तव्य भावनेची प्रशंसा केली होती. आज मुंबईत आल्यानंतर त्यांनी जाधव यांना ‘सह्याद्री’वर बोलावून घेतले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही जाधव यांचा परिचय करून दिला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ तसेच शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांना सन्मानीत केले. या प्रसंगी जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, क्रीडामंत्री सुनिल केदार आदी मंत्रीही उपस्थित होते.