महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील अतिवृष्टीसह पूरस्थितीचा आढावा, यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश - mumbai cm news

मंगळवारपासून सुरू झालेल्या या पावसाने पुणे, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. या सर्व परिस्थितीचा मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज आढावा घेतला. उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर आणि बारामतीमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल- एनडीआरफच्या तुकड्या तैन्यात करण्यात आल्या असून वायूसेना, नौदल, लष्कर यांना तातडीच्या मदतीसाठी हाय अलर्टवर सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Chief Minister took  review of excess rainfall and flood situation in the state
मुख्यमंत्रीकडून राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा, यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश

By

Published : Oct 15, 2020, 6:19 PM IST

मुंबई- राज्यात परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (दि.15) विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. शेतीचे आणि मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीबाबत त्यांनी माहिती घेतली तसेच मनुष्यहानी होऊ नये यासाठी संबधित सर्व यंत्रणांना त्यांनी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला हवेच्या कमी दाबाचा पट्टा राज्यात सक्रीय झाल्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवारपासून सुरू झालेल्या या पावसाने पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीला झोडपून काढले आहे. विशेषतः पुणे, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्हयात उजनी धरण क्षेत्रातील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून जिल्हयातील सर्वच धरणे पूर्णपणे भरली आहेत. पावसाचा बारामती तालुक्यालाही मोठा फटका बसला आहे. तसेच उस्मानाबाद,बीड, लातूर जिल्ह्यातही अतिवृष्टी झाली आहे. जायकवाडी व माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

या सर्व परिस्थितीचा मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज आढावा घेतला. राज्याचे मुख्य सचिव, राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच गृह विभागाकडून परिस्थितीचा आढावा घेतानाच, त्यांना नागरिकांच्या मदतीसाठी आणि समन्वय आणि संनियत्रणावर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री सचिवालयासह विभागीय आयुक्तालय, संबंधित जिल्हाधिकारी यांच्याशी सातत्यपूर्ण समन्वय राखण्यात यावा. आवश्यक त्याठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात करण्यात याव्यात आणि तातडीच्या मदतीसाठी अग्निशमन, पोलिस, तसेच महसूल आणि वैद्यकीय अशा सर्वच विभागांना मदत पथके पाठविण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. तसेच महसूल, कृषी, मदत व पुनर्वसन या विभागांसह आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय मदत व अन्य आवश्यक मदत पोहचविण्यासाठी यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर, मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष राज्यातील जिल्हा कक्षांशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवून समन्वय राखत आहे.


दरम्यान, उस्मानाबाद सोलापूर पंढरपूर आणि बारामतीमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल- एनडीआरफच्या तुकड्या तैन्यात करण्यात आल्या असून वायूसेना, नौदल, लष्कर यांना तातडीच्या मदतीसाठी हाय अलर्टवर सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अतिवृष्टी, वादळी पावसामुळे शेतीचे, पिकांचे नुकसान याबाबत तसेच घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसान यांचेही तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत. पंढरपूरातील कुंभार घाट येथे अतिवृष्टीमुळे भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करून त्यांना तातडीची आर्थिक मदत देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details