मुंबई- कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे बेस्ट प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे वडाळा डेपोबाहेर काल सोमवारपासून कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेऊन मार्ग काढावा, असे साकडे बेस्ट वर्कर्स युनियन व बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने निवेदनाद्वारे घातले आहे.
बेस्ट वर्कर्स युनियन व बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने वेतन करार, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा आदी मागण्यांसाठी सोमवारपासून कामगारांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. याआधी 9 जानेवारीला 9 दिवसांचा संप करण्यात आला होता. न्यायालयाने आदेश दिल्यावर संप मागे घेण्यात आला. मात्र, बेस्ट प्रशासनाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रशासनाला एक संधी द्यावी, म्हणून धरणे आंदोलन करत असल्याचे शशांक राव यांनी स्पष्ट केले आहे. तर सत्ताधारी शिवसेनेने सांगितल्याप्रमाणे आज(मंगळवारी) वेतनकरार झाला नाही, तर मात्र संपाचा निर्णय घेऊ, असा इशारा राव यांनी दिला आहे.