मुंबई : राज्यात सत्तानाट्य घडविण्यामागे केंद्रीय गृहमंत्री ( Union Home Minister ) होते. सूडभावनेचा बदला घेतला, अशा विधानांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी पुन्हा एकदा सत्तांतरावर भाष्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) खऱ्या अर्थाने क्रांती असून बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले सावरकरांचे विचार ते पुढे नेत आहेत, अशी स्तुतीसुमने फडणवीसांनी यावेळी उधळली.तसेच, सावरकरांना शिव्या देणाऱ्या काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray ) बाळासाहेबांचे नाते सांगण्याचा कोणताही अधिकार नाही, असे विधान केले. सावरकर स्मारक येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
अंदमानमध्ये सावरकर गेले नसते, तर शेकडो कैद्यानी आत्महत्या केली असती: एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असून त्यांनी खऱ्या अर्थाने क्रांती केली. आज ते उत्तम काम करत आहेत. त्यामुळे माझी अवस्था सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या बॅटिंगनंतर 11 वा खेळाडू येतो, तशी झाली आहे. सावरकर हे असे देशाचे नेते आहेत, ज्यांनी स्वातंत्र्य पूर्वी कारावास भोगला. मात्र, कॉंग्रेसच्यावतीने सावरकरांबद्दल रोज खोटे बोलले जात आहे. स्वातंत्र्य लढ्यात असलेल्या सर्वाचा मला आदर आहे. पण अत्याचार सहन करणारा सावरकरांसारखा एक नेता दाखवा असे आव्हान फडणवीस यांनी विरोधकांना दिले. अंदमानमध्ये सावरकर गेले नसते, तर शेकडो कैद्यानी आत्महत्या केली असती किंवा ते वेडे झाले असते, असे फडणवीस म्हणाले.
हिंदू ही शास्वत संस्कृती: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी नेहमी विज्ञानाची उपासना केली. हिंदुत्व ही व्यापक संकल्पना आहे. ही संकल्पना देशाच्या मातीशी, संस्कृतीशी आणि जीवनपद्धतीशी जुळलेली आहे. हे सांगणार स्वातंत्र्यवीर सावरकर होते. सर्वोच्च न्यायालयात हिंदुत्वाचा मुद्दा गेला, तेव्हा हिंदुत्व काय हे न्यायालयानेही सांगितले आहे. हिंदू ही शास्वत संस्कृती आहे. या भूमीवर हजारो वर्षांपासून चालत असलेली रीती, नीती आणि पद्धती आहे. ती पुण्यपुरातन आहे. हीच व्याख्या बाळासाहेब ठाकरे यांनी न्यायालयात सांगितली होती, याची आठवणही देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली. आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सावरकर यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत. त्यांना सावरकर यांचा ‘स’सुद्धा माहीत नाही, अशी टीकाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. कुणीतरी त्यांना लिहून देत आणि ते बोललात. या लोकांना योग्य उत्तर दिले पाहिजेत, असे फडणवीस म्हणाले.
हिंदुत्व हे केवळ कर्मकांड नाही ती एक व्यापक संकल्पना : हिंदू समाज हा देशाचा आत्मा आहे. तो मजबूत झाला पाहिजे, हिंदू समाज हिंदुत्वावर एक असला पाहिजे. असं स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अपेक्षित होते. ते बाळासाहेबांनी खरे करून दाखविले. एकाला खालच्या जातीचा दुसऱ्याला वरच्या जातीचा असे दाखवून देशाचे कल्याण होऊ शकत नाही. बाळासाहेबांनी देखील हाच विचार सांगितला. त्यांनी कधी जात मानली नाही. अनेक लोकांना बाळासाहेब ठाकरे यांनी आमदार केले. मायक्रो ओबीसी ज्याच्या जातीचे पाचशे लोक नाहीत. अशा २५ वर्षाच्या तरुणाला तिकीट देऊन बाळासाहेबांनी निवडून आणले. त्याच्या समाजाला कोणी ओळखत नाही, त्यांना बाळासाहेबांनी आमदार केले. जे सावरकरांना अपेक्षित होते ते बाळासाहेब यांना होते. हिंदुत्व हे केवळ कर्मकांड नाही ती एक व्यापक संकल्पना आहे. जे चागले आहे ती घेऊन जाणारी ही संस्कृती असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सावरकरांना शिव्या देणाऱ्यांना तुम्ही जवळ करत आहे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल अभिमान बाळासाहेब ठाकरे यांना होता. मात्र, हिंगोलीत राहुल गांधी सावरकर यांच्याबद्दल इतके वाईट बोलतात आणि आदित्य ठाकरे गळ्यात गळे घालतात. आमचे सोडा, बाळासाहेब ठाकरे यांना स्वर्गात काय वाटले असेल, असा सवाल ठाकरेंना विचारला. तसेच, आम्हाला शिव्या द्या पण सावरकरांना शिव्या देणाऱ्यांना तुम्ही जवळ करत आहेत. त्यामुळे तुम्हाला बाळासाहेब यांचे नाते सांगण्याचा अधिकार नाही, असे उद्धव ठाकरे यांना ठणकावले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचे खरे विचार एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. जोपर्यत सावरकरांना अपमानित करणारे आहेत, त्यांना जमिनीत गाडल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.