महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्री सहायता निधीला गती मिळाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा - Uddhav Thackeray CM Fund

२५ नोव्हेंबर २०१९ पासून सहायता निधीच्या माध्यमातून १०३ प्रकरणात ३५ लाख ८ हजार ५०० रुपयांची मदत रुग्णांना देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

mumbai
मुख्यमंत्री

By

Published : Dec 14, 2019, 2:55 PM IST

मुंबई- विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्री सहायता निधीचे राजकारण केले जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीचे काम अतिशय गतीमान रितीने सुरू असल्याची माहिती दिली आहे. २५ नोव्हेंबर २०१९ पासून सहायता निधीच्या माध्यमातून १०३ प्रकरणात ३५ लाख 8 हजार 500 रुपयांची मदत रुग्णांना देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीबाबत काही प्रसार माध्यमातून नकारात्मक बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे कार्यालयामार्फत माहिती देण्यात आली आहे. वस्तुत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वैद्यकीय सहायता निधीतून जलदरित्या रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याच्या सूचना दिल्या आहेत. २५ नोव्हेंबरपासून वैद्यकीय मदतीसाठी कालपर्यंत ५८७ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी जवळपास ४९५ प्रकरणे मंजूर झाली असून महात्मा फुले जन आरोग्य योजना, धर्मादाय रुग्णालये आणि मुख्यमंत्री सहायता कक्षातून मदत देण्याची कार्यवाही सुरू आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीकडे प्राप्त होणाऱ्या अर्जावर कार्यवाहीसाठी विशिष्ठ कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. प्राप्त होणाऱ्या अर्जांपैकी महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी पात्र रुग्णांना योजनेच्या पॅनेलवरील रुग्णालयाकडे उपचारासाठी पाठविण्यात येते. अशा १९२ प्रकरणात रुग्णांना या योजनेचा लाभ दिला आहे. रुग्ण धर्मादाय रुग्णालयात उपचार घेत असल्यास धर्मादाय आयुक्तांच्या संकेतस्थळावरून संबंधित रुग्णालयात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील किंवा दारिद्रयरेषेखालील घटकांसाठी उपलब्ध खाटांची माहिती घेतली जाते. पात्र रुग्णांना याअंतर्गत पूर्णत: मोफत किंवा ५० टक्के सवलतीच्या दराने उपचार प्राप्त होतात. अशी 87 प्रकरणे धर्मादाय रुग्णालयांकडे पाठविण्यात आली आहेत. याशिवाय कॉकेलर इम्प्लांटची प्रकरणे पुणे येथील अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा यांच्याकडून हाताळली जातात. त्यांच्याकडे 9 प्रकरणे पाठविण्यात आली आहेत.

महात्मा फुले जनआरोग्य योजना, धर्मादाय रुग्णालये आणि कॉकेलर इम्प्लांट अशा पद्धतीने २८८ रुग्णांना मदत देण्यात आली आहे. उर्वरित २०७ रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्याचे निश्चित करण्यात आले असून १०६ प्रकरणात थेट रुग्णालयांकडे मदत वितरीत केली आहे. उर्वरित प्रकरणात कार्यवाही सुरू आहे. ५० प्रकरणात अपूर्ण कागदपत्रे असल्याने कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाकडे मदतीसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाची स्थिती रुग्णांना समजण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार एसएमएस सेवा सुरू करण्याबाबतही कार्यवाही सुरू आहे, असेही सहायता निधी कार्यालयाद्वारे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा-प्रकल्‍पबाधित झोपडीधारकांना 'एसआरए' योजनेत घरे द्या - महापौर पेडणेकर

ABOUT THE AUTHOR

...view details