मुंबई - दलित पँथरचे एक प्रमुख संस्थापक राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक असलेले एक वादळी व्यक्तिमत्व आपण गमावले आहे, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ढाले यांना श्रद्धांजली वाहिली.
आंबेडकरी चळवळीचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला - मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांच्या निधनाने सर्वस्तरावरुन शोक व्यक्त केला जात आहे. ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी ढालेंना श्रद्धांजली वाहिली आहे.
ढाले हे समतेसाठीच्या चळवळीतील एक अभ्यासू आणि ध्येयवादी व्यक्तिमत्व होते. दलित पँथरच्या माध्यमातून समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांच्या आकांक्षांना त्यांनी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ही चळवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचे पर्व आहे. सत्तरीच्या दशकात या चळवळीने केलेला संघर्ष आंबेडकरी चळवळीला एक नवा आयाम देणारा ठरला होता आणि त्यातील श्री राजा ढाले यांचे योगदान अतिशय मोलाचे होते. त्यांच्या निधनाने एक लढाऊ नेता, प्रतिभावंत साहित्यिक आणि परिवर्तनवादी चळवळीचा महत्त्वाचा भाष्यकार आपण गमावला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.