मुंबई- दादर शिवाजी पार्क येथील भारिप बहुजन महासंघाच्या (बहुजन वंचित आघाडीच्या) सभेला भाजप नव्हे तर राज्याच्या मुख्यमंत्र्यानी परवानगी दिली आहे, असा खुलासा भारिपचे प्रवक्ते ज. वि. पवार यांनी केला आहे. काँग्रेसने प्रयत्न केले नसतील म्हणून राहुल गांधींच्या सभेला परवानगी भेटली नसेल, असा टोला पवार यांनी काँग्रेसचे नाव न घेता लगावला आहे.
भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे असदूद्दीन ओवैसी यांच्या बहुजन वंचित आघाडीच्या सभेला परवानगी मिळते. मात्र, राहुल गांधी यांच्या सभेला परवानगी मिळत नाही. यावरून राजकीय तर्क वितर्क वर्तवले जात आहेत. भाजपने काँग्रेसला राजकीय शह देण्यासाठीच सभेला परवानगी दिली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
याबाबत भारिप बहुजन महासंघाचे प्रवक्ते ज. वि. पवार यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही गेले काही महिने सभेला परवानगी मिळावी म्हणून प्रयत्न करत होतो. प्रकाश आंबेडकर स्वतः परवानगीसाठी मुख्यमंत्र्याना भेटले होते. शिवाजी पार्कवर सभेला परवानगी देण्याचे अधिकार मुख्यमंत्र्याना काही दिवस आहेत. त्यांनी त्यांचा अधिकार वापरून सभेला परवानगी दिल्याचे पवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री भाजपचे असले, तरी आम्ही त्यांना राज्याचे मुख्यमंत्री मानतो. संविधानाने आम्हाला बोलण्याचा अधिकार दिला आहे. त्या आधिकाराचा वापर करता यावा, म्हणून सभेचे आयोजन करण्यात आले. त्याला लाखो लोक येतील याची कल्पना मुख्यमंत्र्याना दिली. त्या लाखो लोकांसाठी शिवाजी पार्क योग्य असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले. त्यानंतर मुख्यमंत्र्यानी आम्हाला परवानगी दिल्याचे पवार यांनी सांगितले.