शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता- अनिकेत जोशींची प्रतिक्रीया मुंबई :रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार, अजित पवार यांना घेण्यासाठी भाजपच्या पडद्यामागील हालचाली आणि न्यायालयाच्या निकालावर असलेले सरकारचे भवितव्य या कारणामुळे शिंदे गटातील अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. शिवसेनेत आधीच केलेली बंडखोरी आणि आताच्या ढवळून निघालेल्या राजकीय वातावरणामुळे अस्तित्व टिकवण्यासाठी शिंदे गटांच्या आमदारांकडून पुन्हा परतीच्या वाटेची चाचपणी सुरु झाली आहे. त्यामुळे आगामी काळात शिंदे गटातच बंडखोरीचे निशाण फडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवारांना सोबत घेण्याच्या हालचाली :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदाराना घेऊन सुरत मध्ये जाऊन आठ महिन्यांपूर्वी पक्षाविरोधात बंड केले. त्यानंतर भाजपच्या सोबतीने महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन केले. सरकारने आठ महिन्याच्या कालावधी पूर्ण केला, असतानाच भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना सोबत घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
राजकीय वर्तुळात नवा भूकंप :राज्यात यानंतर नव्या समीकरणाची चर्चा सुरू झाली. तसेच, शिंदे गटाला बाजूला करत अजित पवार यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लावण्याची चर्चाही रंगली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात नवा भूकंप होणार असल्याचे भाकीत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात आले. त्यामुळे भाजपने अजित पवार यांना सोबत घेतल्यास शिंदे गटांचे महत्त्व कमी होईल, अशी भीती शिंदे गटातील आमदारांमध्ये असल्याने त्यांच्यात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
18 जणांचा मंत्रिमंडळ विस्तार :राज्यात भाजप, शिंदे गट सत्तेवर आल्यानंतर 18 जणांचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारासाठी तारीख पे तारीख देण्यात आली मात्र आठ महिने होऊ नये मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकला नाही. यामुळे मंत्री बनण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसणाऱ्या आमदारांमध्ये नाराजी पसरली आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार सत्ता संघर्षाच्या निकालावर अवलंबून आहे. राज्यातील सत्ता संघर्षावर तब्बल सहा महिने सुनावणी झाली. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी घेण्यात आली.
अजित पवार नॉट रिचेबल ?शिंदे गटा विरोधात हा निकाल गेल्यास सरकारला पायउतार व्हावे लागेल. शिवसेना फोडून स्थापन केलेल्या सरकार कोसळल्यास भाजपला मोठ्या नाचक्कीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे त्यामुळे भाजपने मिशन लोटसच्या धरतीवर अजित पवार यांना गळ्याला लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अजित पवार नॉट रिचेबल असल्यापासूनच त्यांच्याविषयीची संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचा खुलासा माध्यमांशी बोलताना केला, असला तरी सुद्धा पहाटेच्या शपथविधीची आठवण कायम असल्याने अजित पवारांविषयीची संभ्रमावस्था कायमच आहे.
अस्वस्थता, कोर्टाच्या निकालावर निर्णय :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजप सोबत येणार आणि सत्येत सहभागी होणार अशा काही अफवा सुरू आहेत. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता असणे, हे स्वाभाविक आहे. दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी अजित पवार येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. परंतु, ते जर सत्येत सामील होणार असतील तर सत्तेतून बाहेर पडू, असा इशारा दिला. मात्र, संजय शिरसाट मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. मंत्री पद मात्र त्यांना आतापर्यंत हुलकावण्यात आला आहे. पुढे भविष्यकाळात किती विस्तार होईल याबाबत ही सांशकता आहे. दुसरीकडे शिंदे सरकार मधील मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांची असलेली अपात्रतेची टांगती तलवार जोपर्यंत दूर होत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार नाही, अशी शक्यता अधिक आहे. त्यामुळे मंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्यांना अधिक काळ वाट पाहावी लागणार आहे. या अस्वस्थतेच्या वातावरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे ज्या अफवा आहेत, त्या बाबींचा पूर्ण निकाल त्यानंतर लागलेला दिसेल, असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - Maratha Reservation : मराठा समाजाला मागास घोषित करा; मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी