मुंबई- आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील झाडांच्या कत्तलीची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. अर्थ विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. येत्या 15 दिवसात याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश समितीला देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात हे आदेश देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आरेमध्ये कारशेड उभारण्यासाठी 2 हजार 100 झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्याची चौकशी होणार होणार आहे. कुणाच्या आदेशावरून ही झाडे तोडण्यात आली? एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाडे तोडण्याची गरज होती का? कारशेडसाठी आरेऐवजी दुसरा पर्याय शोधता आला नसता का? रात्रीच्यावेळीच झाडे तोडण्याची काय गरज होती? आदी प्रश्नांचा ऊहापोह ही समिती घेणार आहे. येत्या 15 दिवसात समितीचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
हेही वाचा - शनिवारपासून मध्य रेल्वेचे नवीन वेळापत्रक लागू