मुंबई : राज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली गेली. दरम्यान काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले होते. त्यांनी पाच लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला घेऊन गेले. यामुळे देखील सरकारवर टीका केली जात आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस 16 ते 20 जानेवारी दरम्यान चार दिवस वर्ल्ड इकॉनोमिक फोरमसाठी दावोस दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यातून राज्यात किती गुंतवणूक येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
महाविकास आघाडीवर आरोप : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातसह इतर राज्यांमध्ये गेल्यामुळे विरोधकांनी सरकारी पक्षाला चांगलंच धारेवर धरले होते. राज्यात सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकार केवळ विरोधकांना दडपण्याचा काम करत आहे. सत्तेत आल्यानंतर मोठ्या प्रमाणात राज्यातील उद्योग गुजरात मध्ये गेले गुजरात मध्ये असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून हे उद्योग गुजरातला घालवले असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. तर सत्ताधारी पक्षाने उद्योग राज्याबाहेर जाण्यामागे महाविकास आघाडी जबाबदार असल्याचा आरोप केला होता.
विरोधकांचा सरकारला सवाल : उद्योगांच्या मुद्द्यावर राजकारण तापले असतानाच काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी - २० समिट मध्ये सामील होण्यासाठी मुंबईत आले. या त्यांच्या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये त्यांनी मुंबईतील उद्योजकांशी बैठका घेऊन जवळपास पाच लाख कोटीची गुंतवणूक उत्तर प्रदेशमध्ये नेली. यामुळे विरोधक अजूनच आक्रमक झाले असून योगी आदित्यनाथ मुंबईत येऊन पाच लाख कोटींची गुंतवणूक घेऊन जातात. मात्र राज्य सरकार नेमके करताय काय? असा सवाल विरोधकांकडून राज्य सरकारला विचारला जाऊ लागला आहे.
वर्ल्ड इकॉनोमिक फोरमसाठी दावोसला : वर्ल्ड इकॉनोमिक फोरमसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 16 ते 20 जानेवारी दावोसला जाणार आहेत. या वर्ल्ड इकॉनॉमी फोरम मधून राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचा दबाव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर असणार आहे. चार दिवसाच्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे 15 तारखेला रवाना होणार आहेत. महाराष्ट्र सहित गुंतवणूक आपल्या इथे आणण्यासाठी केंद्र सरकारची टीम, आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्याच्या टीम देखील सामील होणार आहेत.