मुंबई Chhatrapati Shivaji Maharaj Statue : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा (Jammu and Kashmir Kupwara) येथे 'आम्ही पुणेकर' या संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापित करण्यात आलाय. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. यावेळी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल, राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, लष्करी अधिकारी, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव इत्यादी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात वीर पत्नींना सन्मानित : कुपवाडा येथे होत असलेल्या या कार्यक्रमात वीर पत्नींना सन्मानित करण्यात येणार असून, वीर हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांना अभिवादन करण्यात येईल. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी 'राष्ट्रीय रायफल्स-41' चे जवान अतिशय उत्साहित असून, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटत आहेत. मागील आठवड्यात हा पुतळा जेव्हा या परिसरात दाखल झाला, तेव्हा जवानांनी ढोल, ताशे आणि झांज वाजवून जल्लोषात स्वागत केलं.
मुंबईत झालं होतं पूजन : छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याचं पूजन राज्यपाल रमेश बैंस यांच्या हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत २० ऑक्टोबर रोजी राजभवन येथे झाल्यानंतर हा पुतळा कुपवाडाच्या दिशेनं रवाना झाला होता. मंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्यातून 'आम्ही पुणेकर' या संस्थेतर्फे हा पुतळा उभारण्यात येत आहे.
कसा आहे महाराजांचा पुतळा : कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत उभारण्यात येणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा साडे दहा फुट उंचीचा असून, जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि ७ x ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. या उपक्रमाला सर्वतोपरी सहाय्य केले जाईल, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं होतं. कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमीपूजन भारतीय सेनेच्या 'राष्ट्रीय रायफल्स'च्या ४१ व्या बटालीयनचे (मराठा लाईट इन्फ्रंटरी) कमांडिंग ऑफीसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष अभयराज शिरोळे यांच्या हस्ते २० मार्च २०२३ रोजी पार पडले होते. नवीन तंत्रज्ञानाने बनविलेला छत्रपतींचा हा पुतळा जम्मू-काश्मीरमधील प्रतिकूल हवामानात दिर्घकाळ तग धरेल असा बनवला आहे.
हेही वाचा -
- Diwali Festival २०२३ : बच्चे कंपनी रमली इंटरनेटच्या दुनियेत, दगड-मातीचे किल्ले नामशेष
- Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh : वाघनखं केव्हा आणणार? मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले..