मुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मूक आंदोलन केली. या मूक आंदोलनानंतर राज्य सरकारने चर्चेसाठी बोलावलं होतं. या बैठकीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक पाऊल उचलले, अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आले. मात्र, दोन महिने उलटून गेल्यानंतरही मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर दिसत नाही. राज्य सरकारकडून अद्याप कोणत्याही मुद्द्यावर सकारात्मक पाऊल उचलले गेले नसल्याची खंत राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे.
आरक्षण आणि मराठा समाजातील तरुण आणि विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सवलती लवकरात लवकर सुरू व्हाव्यात यासाठी पुन्हा एकदा मराठा समाजाला आंदोलन करावं लागेल का? असाही प्रश्न राज्य सरकारला संभाजीराजे छत्रपती यांनी विचारला आहे. मात्र, सध्या कोरोना परिस्थिती असल्यामुळे आंदोलन होऊ नये, अशी भूमिका मराठा समाजाची आहे. पण मराठा समाजाने मला एकट्याला आंदोलन करण्यास सांगितलं तर, कोणत्याही क्षणी आपण मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणाचा बाबतीत आंदोलनाला बसू, असा इशारा संभाजीराजे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
मुंबईत आज (बुधवारी) आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होऊन दोन महिने झाल्यानंतरही मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आणि तरुणांना काही सवलती उपलब्ध व्हाव्यात यासाठी मागण्या केल्या होत्या. मात्र, अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे अद्यापही मराठा समाजातील तरूण आणि विद्यार्थ्यांना काही सवलती मिळाल्या नसल्यामुळे अधिकाऱ्यांवरही संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला.
हेही वाचा -बेळगावमध्ये मराठी माणसाचा विजय तर संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव - फडणवीस