छत्रपती संभाजीनगर : शहरातील व्यावसायिकाच्या पत्नीनं कथित पाकिस्तानच्या बॉयफ्रेन्डला भेटण्यासाठी पतीला सोडून दुबई गाठल्याची माहिती समोर आल्यानं छत्रपती संभाजीनगरात मोठी खळबळ उडाली आहे. ही महिला उमराहला जाण्यासाठी संभाजीनगरातून निघाली होती. मात्र त्यानंतर ही महिला न परतल्यानं तिच्या पतीनं 23 डिसेंबर 2022 ला पत्नी हरवल्याची तक्रार सिडको पोलीस ठाण्यात दाखल केली होती. दरम्यान ही महिला 4 ऑगस्टला परत आली असून त्यानंतर तिच्या पाकिस्तानच्या कथित पतीनं तिच्या छत्रपती संभाजीनगरमधील पहिल्या पतीला कॉल करुन महिलेसोबत लग्न केल्याची कागदपत्रं आणि फोटो पाठवले. त्यामुळे या महिलेच्या पतीनं महिलेबाबतची माहिती सिडको पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता मात्र एटीएस या महिलेची 'ट्रॅव्हल हिस्ट्री' शोधत आहे.
हा ईमेल आला आहे तो कदाचित खोडसाळपणानं केला असू शकतो, अशीही शक्यता नाकारता येत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. याबाबत आम्ही आणि एटीएस तपास करत आहोत. त्याबद्दल आम्ही आता काही सांगू शकत नाही. गोपनीयता राखण्यासाठी आम्ही फक्त तपास करतोय, लवकरच या सर्व घटनेचा संपूर्ण पर्दाफाश होईल - स्थानिक पोलीस
महिलेच्या पतीला आला ईमेल :या महिलेच्या कथित पतीनं हा ईमेल स्थानिक पोलीस, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड, सीआयएसएफ आणि नागरी विमान वाहतूक महासंचालकांनाही पाठवला होता. सध्या ही महिला मालेगाव इथं आई-वडिलांसोबत राहात आहे. स्थानिक पोलिसांनी तसंच एटीएस आणि आयबी अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे.
डिसेंबरमध्ये सोडलं पतीचं घर :ही महिला दोन वर्षांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून कथित पाकिस्तानी नागरिकाच्या संपर्कात असल्याचं तपासात समोर आलं आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये तिनं पतीचं घर सोडलं. तिच्या पतीनं 23 डिसेंबर 2022 ला पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. संबंधित महिलेचे आईवडील मालेगावमध्ये राहत असून तिचं लग्न संभाजीनगरमधील एका व्यावसायिकासोबत झालं होतं. त्यानंतर ती संभाजीनगरमध्ये राहात होती.