मुंबई/छत्रपती संभाजीनगर Chhatrapati Sambhajinagar Fire Case : छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज औद्योगिक परिसरातील सनशाईन एंटरप्रायझेस युनिटमध्ये पहाटे एक वाजता आग लागली होती. त्यावेळी तेरा कामगार आत झोपले होते, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या आगीतून सात जणांनी हातमोजे युनिटच्या टिनचं छत तोडून स्वत:चा बचाव केलाय, तर सहा जणांचा मृत्यू झालाय.
5 लाख रुपये मदत देण्याचे निर्देश : मुख्यमंत्री कार्यालयानं दिलेल्या निवेदनात म्हटलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच जखमींचा वैद्यकीय खर्च उचलण्यात येणार असल्याचं निवेदनात म्हटलंय. तसंच या घटनेबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केलंय. रविवारी पहाटे 3.30 वाजता ही आग विझवण्यात आली, असं एक अधिकाऱ्यानं सांगितलंय.
सहा मृतदेह बाहेर काढले : अग्निशमन विभागाचे अधिकारी मोहन मुंगसे यांनी सांगितलं की, जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसी परिसरात हातमोजे बनवण्याचा कारखाना आहे. पहाटे एकच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तोपर्यंत आग संपूर्ण कारखान्यात पसरली होती. पाच जण आत अडकल्याचं स्थानिकांनी सांगितलं. आमचे अधिकारी कारखान्यात पोहोचले, पण तोपर्यंत सर्वांचा मृत्यू झाला होता. आम्ही सहा मृतदेह बाहेर काढले आहेत. कारखान्यात आग लागली, तेव्हा कारखान्यात काम करणारे 10-15 कामगार आत झोपले होते. आगीचे लोळ पाहून कामगारांमध्ये घबराट पसरली. काही लोक तेथून बाहेर पडण्यात यशस्वी झाले, तर काही आतमध्ये अडकले, असं एका कामगारानं सांगितलं.