No Relief To Bhujbal : छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी टांगती तलवार कायम, कोर्टाने दिली पुढची तारीख - महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी टांगती तलवार कायम
छगन भुजबळ यांच्या खटल्यामध्ये तारीख पे तारीख मिळत असल्याचे दिसत आहे. छगन भुजबळ यांना ईडीच्या खटल्यात आजही दिलासा मिळाला नाही. सक्त वसुली संचालनालयाने दाखल केलेल्या खटल्यात आता 12 जूनला पुढील सुनावणीवेळी सर्व 52 आरोपींना हजर राहण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे भुजबळ यांच्यावर टांगती तलवार कायम आहे.
मुंबई -महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांना अजूनही दिलासा मिळालेला नाही. या संदर्भात पुन्हा सक्तवसुली संचालनालयाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. तो गुन्हा रद्द करण्यासाठी छगन भुजबळ यांचा अर्ज न्यायमूर्ती रोकडे यांच्या न्यायालयात दाखल झाला होता. मात्र न्यायालयाने सुनावणी तहकूब करून 12 जून रोजी पुढील सुनावणी निश्चित केलेली आहे. कथितरीत्या महाराष्ट्र सदन प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे. त्यामध्ये छगन भुजबळ तसेच त्यांच्यासह इतर आरोपी देखील आहेत. वास्तविक या प्रकरणांमध्ये न्यायालयानेच छगन भुजबळ यांना निर्दोष म्हणून त्यांची एसीबीच्या संदर्भातील खटल्यातून मुक्तता केली होती. परंतु त्यानंतर सक्त वसुली संचालनालयाने पुन्हा त्या अनुषंगाने नवीन गुन्हा दाखल केला. त्यामुळे हा खटला मुंबईच्या पीएमएलए न्यायालयात सुरू आहे.
या खटल्याच्या संदर्भात छगन भुजबळ जेव्हा गैरहजर राहिले होते. तेव्हा त्यांच्या नावे न्यायमूर्ती रोकडे यांनी वॉरंट जारी केले होते. म्हणून नियमितपणे छगन भुजबळ हजेरी लावत असतात. परंतु राजकीय नेते असल्यामुळे अनेकदा ते व्यग्र असतात. काहीवेळा गैरहजर असण्याची सूट बाबत त्यांनी न्यायालयाकडे अर्ज देखील केला होता. पुढील 12 जून रोजी होणाऱ्या सुनावणी मध्ये सर्व आरोपींसह हजर राहण्याचे निर्देश ही पीएमएलए न्यायालयाने दिले आहेत.
एका न्यायालयाने संबंधित गुन्ह्यामध्ये दोष मुक्त केले. परंतु ईडीच्या वतीने पुन्हा त्यांच्यावर त्याच प्रकरणात गुन्हा दाखल केल्यामुळे दोष मुक्ती करण्यासाठीचा छगन भुजबळ यांचा हा अर्ज आहे. या संदर्भात १२ जून रोजी आता न्यायालयात दोष मुक्तीच्या अर्जावर पुन्हा सुनावणी होईल. मात्र 12 जून रोजी सर्वच्या सर्व 52 आरोपी यांनी हजर राहावे; असे देखील न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा भुजबळ यांच्यावर टांगती तलवार कायम राहणार आहे.